नित्य पुण्याची जगी या गस्त आहे
पाप पापातच तरी का मस्त आहे ?
शोधतो का आज येथे तू शिवाजी ?
जन्मतो तो एकदा हा दस्त आहे
कागदावर नोंद उरली फक्त आता
कुंपणाने शेत केले फस्त आहे
ऊन अनवाणी कधीपासून चाले
शोधण्या ते सावलीला व्यस्त आहे
भ्रष्ट पैशानेच पैसा जमविला अन
ह्या गरीबीलाच केले स्वस्त आहे
२ .
भेटतो केंव्हा किनाऱ्याला किनारा ?
लाट ही त्यांच्या निरोपाचा सहारा
शांत दिसतो चेहरा माझा जरी हा
वाहती माझ्यात तांडव रक्तधारा
आर्त किंकाळी तिची ऐकूनही का ?
पाठमोरा कान होतो ऐकणारा
ह्या छतावर हक्क माझा वाटले अन
त्याचवेळी मोडला कोणी निवारा ?
सभ्यता शापीत ठरते रोज येथे
दुर्गुणांचा वाढला मोठा पसारा
सहनशक्तीचा नको तू अंत पाहू
धुमसतो राखेत केव्हाचा निखारा
आग - वणवे पेलणारी जात माझी
संकटांना वाटतो माझा दरारा
- अॅड छाया गोवारी
No comments:
Post a Comment