Showing posts with label सुहासिनी विवेकरंजन देशमुख. Show all posts
Showing posts with label सुहासिनी विवेकरंजन देशमुख. Show all posts

सुहासिनी विवेकरंजन देशमुख : चार गझला


१.
लागता भांड्यास भांडे; शांतता टिकणार कुठवर? 
एक धागा संशयाचा...लावतो नात्यास कातर

एवढ्यासाठीच आई, सावरी साऱ्या घराला 
एक टाका उसवला तर...फाटते सगळीच चादर

चार पोरे असुन त्याचा, पोरगी सांभाळ करते 
का करावी मग विधात्या...पोरगा होण्यास मरमर?

पान ही हलले तरी, आवाज येथे होत आहे 
शांतता पाहून दिसते...वादळे येणार घरभर

पोरगी देतो कुणी का, एकट्या पोरास आता? 
नोकरी असली तरीही...लागते नवऱ्यास वावर

भीक मागायास बसते, चिमुकली दारात त्याच्या 
सांग फुटतो का तरीही...त्या तुझ्या देवास पाझर?


२.
कलियुगाचा हा नवा अवतार आहे; 
सज्जनाला तोंड दाबुन मार आहे!

जानकीसह राम वनवासात गेला;
उर्मिला इकडे घरी लाचार आहे!

शाम-राधा प्रेमरंगी नाहले अन; 
रुक्मिणीला कुंकवाचा भार आहे!

मी कुण्या शब्दांत हा रोमांच मांडू;
 तू तुझे समजून घे...होकार आहे!

शांत समयी फक्त मजला पाहतो तो; 
केवढा त्याच्यातही शृंगार आहे!

सांजवेळेला घरी परतून ये ना;
 आपल्यालाही नवा संसार आहे!


३.
तुझ्या भोवताली खुळा पाश आहे; 
क्षणाचा विसावा..पुन्हा नाश आहे

नभी चांदणी फक्त चमकून गेली;
 नि वेडात सारेच..आकाश आहे

कुणी खोड काढून जातो तिची अन; 
तिला वाटतो मीच..बदमाश आहे!

नको दोन डगरींवरी पाय देऊ; 
अश्या वागण्यातच..खरा नाश आहे!

गडयांनो जरा आग उशिराच लावा;
'तिला' यायला फार..अवकाश आहे



 ४.
कुणी केले असे इतके तुझ्या भाऊक डोळ्यांना? 
कशाने लागल्या धारा लगोलग मूक डोळ्यांना??

मना समजावले हज्जारदा की तो तुझा नाही; 
कसे समजून सांगू, सांग या नाजूक डोळ्यांना?

तुझ्या नादात हे पाउल तुझ्या दाराकडे वळते; 
किती असतात बघ वाटा तुझ्या ठाऊक डोळ्यांना!

मला सगळीकडे इतका तुझा का चेहरा दिसतो? 
सख्या नजरेतूनी केलेस का चेटूक डोळ्यांना??

तुझे मी नाव घेते सारखे झोपेतही आता; 
सख्या रे लागली आहे तुझी या भूक डोळ्यांना!

अदा मारायची डोळा म्हणे घायाळ करते रे; 
करू का सांग मी माझ्या जरा बंदूक डोळ्यांना?

- सुहासिनी विवेकरंजन देशमुख