संदीप पाटील : तीन गझला



१. 
बंद खोलीत वेडी हवा शोधते.
तीच आगी मधे गारवा शोधते.

झाड नाही इथे एक शिल्लक कुठे,
एकटे पाखरू मग थवा शोधते.

खूप कौतुक तुझे लोक करतात पण,
फक्त माझीच तू वाहवा शोधते..!

पार करणार जो सात सागर तिचे,
एक कोळिन तिचा नाखवा शोधते.

रात्र होताच जो चांदनी वर रुसे,
फक्त उल्का असा चांदवा शोधते.

शेवटी  एक पर्याय आहेच मी,
मित्र एफबि मधे का नवा शोधते.


२.
हवा पुरेल कोठवर पुरेल श्वास कोठवर..?
तुझा सुगंध यायचा म्हणे कधी शहर शहर..!

मना विरुद्ध बंड तू पुकारलेस जर पुन्हा,
जूना सुटेल प्रश्न पण मिळेल का नवीन घर?

तुला असेच भासते तुझ्यात गुंतलोय मी,
तुझ्यात तू मिळव मलाच वेगळे तुझ्यात कर..!

तुला अजून सावलीत यायचे असेल तर,
गिळून टाक सूर्य तू तुझ्यात एक चंद्र धर..!

तुझ्यात तूच काय काय शोधतोय आत हे,
स्वतः पुरून मग कधी स्वतःस तू स्वतः उकर..!

  
३.   
भेटतो दिवसा उजेडी आज काळोखात भेटू..!
बाजुला सारू दुरावा चल जरा ओठात भेटू..!

मग अशा दुखऱ्या नसेवर बोट तू धरतेस माझ्या,
ओळखीचा राहुनी मी तू म्हणे अज्ञात भेटू..!

चालतो आहे कधीचा ,थांबलो नाही कधी मी,
पायवाटा संपल्यावर कोणत्या रस्त्यात भेटू..!
भेटल्या नंतर तुला जर पाहिजे सहवास माझा,
झोप तुही आज लवकर मग तिथे स्वप्नात भेटू..!

मागच्या जन्मीच अपुली भेट ठरलेली खरेतर
जास्त नाही मागणे पण वेगळ्या विश्वात भेटू..!

- संदीप पाटील

   



No comments: