अनिल पाटील : चार गझला

१.
अचानक जीभ ही अडते तुला मी हे कसे सांगू
मला तू खूप आवडते तुला मी हे कसे सांगू

निळ्या साडीत येतांना जरा सावध असावे तू
निळे आभाळ गडगडते तुला मी हे कसे सांगू

तुझ्या नाजूक देहाचा जरासा तोल जातो अन
ह्रुदय माझेच धडधडते तुला मी हे कसे सांगू

तुझ्या मेघापरी काळ्या जरा सांभाळ केसांना
उराशी वीज कडकडते तुला मी हे कसे सांगू

तुझ्या गंधाळल्या देही फुलांचा वास दरवळतो
मनाला भूल ही पडते तुला मी हे कसे सांगू

खळीचा चंद्रमा गाली उशेची लालिमा अधरी
मन भ्रमरापरी उडते तुला मी हे कसे सांगू

कधी इकडे कधी तिकडे तुला शोधावयासाठी
नजर माझीच धडपडते तुला मी हे कसे सांगू

सखे येना जरा जवळी पुरे झाला दुरावा हा
उगा का व्यर्थ अवघडते तुला मी हे कसे सांगू

तुझ्या भाळीच लाभावा टिळा माझ्याच नावाचा
मणी कांचन जसे जडते तुला मी हे कसे सांगू


२.
माणसांचे ह्रुदय जर का समजले असते
चेह-यांनी का कुणाला फसविले नसते

हात अंधारासवे मी मिळविला असता
आज घर माझे दिव्यांनी उजळले असते

पोटापाण्याचा उराशी प्रश्न नसता तर
रंग आम्हीही सुखाचे उधळले असते

मी अन्यायाला मुक्याने सोसले नसते
काल जर शाळेत पाढे गिरवले असते

वागलो असतो कलाने मौसमाच्या जरा
मेघ माझ्याही घरावर बरसले असते


३.
दिसते समानता पण झाल्या न एक वाटा
अजुनी पिढ्यापिढ्यांचा सलतो उरात काटा

परतून पाखरे ही येतील आसऱ्याला
आशेत या घराला सांभाळतात नाटा

बेभाव यौवनाचा होतो लिलाव तेथे
पोटात भूक जेथे नसतो घरात आटा

ही भिंत एकतेची टिकणार सांग कैसी
धर्मांधळेपणाच्या येती फिरून लाटा

शोधून भेटती ना सत्कर्मी औषधाला
लाचार माणसांचा नाही जगात घाटा

४.
दांडाचंं पानी दांडात मुरे 
जिंदगी सांग कोनाले पुरे

कास्तकाराच्या गयात फासंं
नेत्याईले घाला हार न तुरे

योजना येती देऊन जाती
कास्तकाराच्या हाती धतुरे

अभायी ढग वाकुल्या दावे
शेताचा जीव पीकात झुरे

राजाची रानी रानीचा राजा
माय न बाप उपाशी फिरे

कोनाचा काय भरोसा देऊ
सगाच घाली पाठीत सुरे

बांधति सारे घर न दार
जोडे ना कोनी मनाचे चिरे

मीरुग कसा मुक्याचा मुका
हुंदके देती वावर धुरे

- अनिल पाटील

No comments: