संजय विटेकर : तीन गझला



१.
त्या घराचा डौल का गेला असावा 
उंबरा तर मातला त्याचा नसावा ?

हारले ना जिंकले त्यांच्यात कोणी 
हा पराभव त्या सुऱ्याचा का नसावा ?

तळ कशाला ढवळते माझ्या मनाचा 
वादळे घेतात तेथे बघ विसावा..

बघ तुला संधी नसे अवतारण्याची 
वास या मातीस संताचा असावा..

कावळा योनीत होतो मी तसा पण 
पिंड पारखता मला आला नसावा..

२.
करावा गुन्हा तर पटाईत नाही
गुन्हेगार मी पण सराईत नाही

असा त्याच प्रश्नास घायाळ झालो
जखम ज्यास माझी ति-हाईत नाही

जसा घाव नजरेत होता तुझ्या जो
तसा कोणत्याही लढाईत नाही

पडेनाच लागू कशी काय मात्रा
इथे तर कुणाजवळ ताईत नाही

कधीही तुझा कळव होकार आता
तसा मी अता हातघाईत नाही... 

३.
वार नजरेचे तुझ्या अलवार कर तू
ऐवढे माझ्यावरी उपकार कर तू

मालकीचा सांगण्यापआधी जरासे
पाहिलेले स्वणप्नय दर्जेदार कर तू

का विरोधी पाळले आहेस माझे
जाळण्याधचा शेवटी निर्धार कर तू

लाव तू आरोप माझ्यावर कितीही
फक्तत शब्दां ना जरा भरदार कर तू

बोलण्याआने काय नुसते होत असते
स्वणप्न ऐखादे तरी साकार कर तू

पावलो नाही कधीही मी मला..
पण देवपण माझेच दारोदार कर तू

- संजय विटेकर 

No comments: