जयदीप विघ्ने : पाच गझला



१.
लाभला नाही कधी हिरवा चुडा
कोरड्या धरणात नसतो बुडबुडा

हिरवळीची लागली स्वप्ने पडू
या कुणी माझे उगवते मन खुडा

या फुलावर त्या फुलावर हिंडते
मन म्हणावे यास की हा तुडतुडा

एवढ्यासाठी तुला मी टाळतो
देह हा वेडावतो मग बापुडा

वाटते मांडेल जर विद्रोह तर
त्या कळीला उमलण्याआधी खुडा

२.
हिच्या तोंडावरी मारा कुणी पाणी हिला उठवा
अरे ह्या लोकशाहीला कसा झाला असा लखवा

तिला डसल्या असाव्या का समाजाच्या रितीभाती
'सतीची चाल परवडते' असे का बोलली विधवा

नको सांगू नको सांगू कला बैमान वाटेच्या
इथे आलास तू म्हणजे तुलाही लागला चकवा

कसे ढाळायचे अश्रू शिकवतो मी कला त्याला
ढगाला एकदा आता कुणी माझ्याजवळ बसवा

यशाने घातले काजळ तुझ्या नजरेमधे इतके
तुला दिसणारही नाही कधी माझ्यातला वणवा

३.
मला दिनरात ठणकेचा कुठे उद्धार आवडतो
तरीही का असे होते कुणाचा वार आवडतो

दिला वाटेत नजरेच्या किती काळोख वेचाया
सहज म्हटलो असे होतो मला अंधार आवडतो

पुढे एकाच वाक्याची मला पारायणे पुरली
कधी ती बोलली होती 'मला तू फार आवडतो'

व्यथा इतकीच सांगा की पुढे मी संपलो नाही
कथा सांगू नका कोणी तिला जर सार आवडतो

भिकारी बोलला लाजत "शिळे थोडे अधिक मिळते "
खरेतर एवढ्यासाठी मला सणवार आवडतो

४.
बदलती बदलती हवा पाहिजे
फुलाला शहारा नवा पाहिजे

नको वाटते झाड दारी उभे
मनोरंजनाला थवा पाहिजे

तुम्ही नाचवा सूर्य तुमच्या घरी
मला सोबती काजवा पाहिजे

तिची फार केली फुकट कौतुके
जगाया तिला वाहवा पाहिजे

जगाची नको फार चिंता करू
तुझ्या तू पुढे नागवा पाहिजे

तिची मागणी सांगते छळ तिचा
तिला जन्मही आठवा पाहिजे

असे भाग्य उजळून यावे कधी
तुझा स्पर्श अन गारवा पाहिजे

५.
पापण्यांची कोरडीठण राहुटी नंतर
मी पुन्हा नाही बरसलो ढगफुटीनंतर

सरबराई फारशी झाली तुझी नाही
मी पुरा कंगाल झालो त्या लुटीनंतर

कोंब नात्याला पुन्हा फुटणार एखादा
भेटही मग टाळली ताटातुटीनंतर

तू चुका हटकून करना लेकरावाणी
मी जरा रागावतो दाटूमुटीनंतर

जन्म म्हणजे एक शाळा चल असे समजू
भेटलो असतो कधी मधल्या सुटीनंतर..?

- जयदीप विघ्ने 

No comments: