सुरेश सायत्री किसन धनवे : दोन गझला


१.

समाजाच्या भल्यासाठी मला गद्दार होऊ दे !
भलेही संयमाची मग कुठे तक्रार होऊ दे

जिवाला घोर कर्जाचा मिळेना दाम घामाला
भुक्या कंगाल बापाचा अता एल्गार होऊ दे

अरे,हा नागडा भारत कसा गावात जगतो बघ!
अता निद्रिस्त श्रद्धेला तरी साकार होऊ दे

अहो, हा देश बुद्धाचा,खुदा,जैना नि रामाचा
तया बंधू समजणारे तुझे सरकार होऊ दे

नको शोधू मला मृत्यो तुझ्या दारात येइल मी
व्यथेला जाळण्यापुरते,तुझे उपकार होऊ दे


२.

हिंसेत पाप आहे, वदली अभंगवाणी!
होते अजून पूजा,कापून रोज प्राणी! 

संवेदना जगाच्या,इतक्या उदास झाल्या !
हृदयासही कळेना,हृदया तुझी विराणी !

मंदीर आणि मस्जिद,नुसताच बोलबाला
संस्कार सभ्यतेचा,होतो कुण्या ठिकाणी !

सन्मान बायकांचा,सांगून संत गेले
नुसतीच आसवांची, गातात लोक गाणी

भेटून प्रेयसीला,आलोच थांब मृत्यो  !
डोळ्यातले तिच्याही, येतो पुसून पाणी !

- सुरेश सायत्री किसन धनवे

No comments: