मनीष मालसुरे : दोन गझला



१. 
थोड्या सुखास आता केली गुहार आहे
पाऊस आसवांचा प्यालो चिकार आहे

साधाच प्रश्न माझा घर चालवू कसे मी?
वस्तू महाग झाल्या थोडा पगार आहे

होतो तुला म्हणालो आणील चांदतारे
पण आज काल मीही खातो उधार आहे

घाई नको करू तू आता मरावयाची
ही फक्त जीवनाची झाली दुपार आहे

ह्यालाच का म्हणावा हा न्याय देवताचा
होते खर्यास फाशी खोटा फरार आहे

२.
मागतो मी तुला वस्र ना भर्जरी
फक्त घामेतली पूर्ण दे भाकरी

फास घेऊ कसा कर्जफांदीवरी?
वाट पाही भुकी लेकरे ती घरी

शासनाचा खुळ्या न्यायही पांगळा
मदत येई घरी जीव गेल्यावरी

मज नको बंगला लाख पैका तुझा
घाल टाके जरा फाटल्या अंतरी

झिंगतो रोज मी देश नेतो पुढे
हीच असली नशा शेतकीची बरी

खा पुरी योजना छाट बुंध्यात मज
मी पुन्हा जन्मतो कोंब फुटल्यापरी

शेतबांधावरी रोज मरतोच मी
मी जगे एकदा पीक आल्यावरी

देवळाच्या कशा पाय-या झिजवशी?
भूक शमवीत जा हीच भक्ती खरी

आज फुलला मळा ऐनवेळी अता
जाळणा-या नको पावसाच्या सरी

ये सुखाने करू साजरी ही सुगी
मी तुझा जोंधळा तूच माझी वरी 


 - मनिष मालुसरे
949, आनंद नगर, शिवसेना
शाखेजवळ, श्री.साई समर्थ
क्लासेस,कोपरी, ठाणे (पू)
400603
मो-9867135513

No comments: