रत्नमाला शिंदे : पाच गझला



१.
काय खोटे अन खरे ते ठरवले आहेस तू
वाटते आहे तुला जे मानले आहेस तू

जे मला बोलायचे मी बोलले आहे कुठे
जे तुला ऐकायचे ते ऐकले आहेस तू

हृदय ,मेंदू आणि मनही खात आहे बघ किती
कोणते भलते जनावर पाळले आहेस तू

काय वारंवार इतके आठवत आहे तुला
गिरवतो आहेस का जे खोडले आहेस तू

हे बरे झाले तुला किंमत कळाली शेवटी
शून्य आहे एक मी हे जाणले आहेस तू


२.

फक्त सुखाच्या सुंदर गोष्टी लिहू नये
दुःखाच्याही सगळ्या नोंदी लिहू नये

चंद्रानेही व्हावे व्याकुळ अपरात्री
कुण्या कवीने इतक्या रात्री लिहू नये

किंचाळू दे डायरीतल्या पानांना
हौसेपोटी उगाच काही लिहू नये

अमर वगैरे होणाऱ्यांना होऊ दे
कुणी कुणाची प्रेमकहाणी लिहू नये

जगता जगता स्वतःच कविता होउन जा
जगण्यासाठी कविता खोटी लिहू नये

३.

नको नको ते कसे पचवले नको विचारू                                            
कशामधे काय मी मिसळले नको विचारू

मला चुकांनी किती शिकवले नको विचारू
किती,कसे अन् कुणी चुकवले नको विचारू

कितीक वचने कितीक स्मरणे हजार गोष्टी
कुणी मला नेमके जगवले नको विचारू

कबूल केले लढूनही मी हरून गेले
कुणी हरवले कसे हरवले नको विचारू

जगात वेडे कुणीच नव्हते मला मिळाले
मलाच वेडे कुणी ठरवले नको विचारू

स्वतःस्वतःशी बऱ्याच वेळा लढून झाले
स्वतःस्वतःला कसे हरवले नको विचारू

लपून माझ्यामधेच होते किती विदूषक!
कुणी कुणाला कसे हसवले नको विचारू

किती मुखवटे कुणी बदलले नको विचारू
कुणी मुखवटे कसे बदलले नको विचारू

अखेर शेवट जसा म्हणावा तसाच झाला
कितीक मेले कितीक जगले नको विचारू

जगा!तुझे मी कधीच नाही नियम विसरले
जगायचे मी कशी विसरले नको विचारू

रुसून माझ्यामधून कोणी निघून गेले
कुणीच नाही कसे अडवले नको विचारू

४.
शून्यात मांडलेला माझा तुझा पसारा...
कित्येक जन्म गेले घालीत येरझारा...

इतक्यात स्थान माझे ठरवू नका कुणीही...
येईल वेळ तेव्हा होईन ध्रूवतारा...

उमले व्यथा फुलांची देहात आज साऱ्या...
घेवून गंध माझा गेला निघून वारा...

येऊन लाट गेली सरली बरीच वर्षे...
अद्याप काळजाचा उद्ध्वस्त हा किनारा...

ठरले किती निरर्थक अंदाज जीवनाचे...
केले वजा तुला अन् चुकला हिशेब सारा...

५.

इथे माझे कुणी नाही असो चल चांगले आहे
स्वतःला का कधी कोणी स्वतःचे मानले आहे

कुणाला काय मी देऊ पुरावे नष्ट झाल्याचे
पुराव्यांसह कितीदा मी स्वतःला जाळले आहे

मला तर येतही नाही इथे आवाज कोणाचा
मला कोणी अशा दुर्गम ठिकाणी आणले आहे

बरे झाले तुला कळली जराशी पात्रता माझी
कुठे इतकेतरी मीही स्वतःला जाणले आहे

गरज नाही कुणालाही कुणी समजून घेण्याची
इथे समजून झाल्यावर कुणी पस्तावले आहे

- रत्नमाला शिंदे

No comments: