प्रा.जगदीश घनघाव : दोन गझला


१.               
तू उपमेय माझे एक या विश्वात तुज उपमान नाही
तू एकमेव प्रज्ञासूर्य तुजसम दुजा प्रज्ञावान नाही

त्यांनी कितीही आणला आव विद्वतेचा या रे जगी
झाले बहू होतील बहू परी तुजसम विद्वान नाही

स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, विज्ञानाचाच पुरस्कार
तुझ्यासम जगात कुणी निर्माण केले संविधान नाही

जुलमी परंपरेचा केलास चुराडा ज्ञानशस्त्राने
त्यांच्या धर्मग्रंथांनी आमुचा केलाच सन्मान नाही

सहस्त्र वर्षे त्यांनी केला पदोपदी अपमान आमुचा
तुजसम जागृत केला आमुचा असा स्वाभिमान नाही.


२. 
तुझ्या शुद्ध पदस्पर्शाने पाणी पहा चवदार झाले
तू रे सत्याग्रह केला आणि अस्पृश्य हक्कदार झाले

क्रांतीची ठिणगी पहिली तूरे तेथे पेटविली
मानवाच्या मुक्तीसाठी ते लढे दमदार झाले

दुष्ट नीच परंपरांना नित्य ठरे एक आव्हानच तू
मनुस्मृतीचे दहन केले नि त्रस्त ठेकेदार झाले

सहस्त्र वर्षांनी लाभलास भारतास महापुरुष तू
इतिहास बदलला आणि शोषितही सरदार झाले

प्रत्येक शतकात राबले ते त्यांच्याच सुखासाठी
तुझ्यामुळे बहुजन आता सर्वत्र अंमलदार झाले

परिवर्तनाचे स्वागत करण्या जे नित्य पुढे असतात
तेच तुझ्या चळवळीचे खरेच वारसदार झाले

No comments: