बाळ पाटील : पाच गझला



१.
पिंजरा त्यांचा तसा अलिशान होता
पोपटाचा केवढा सन्मान होता

दावलेली गाजरेही वेशधारी
तू दिलेला गोड हलवा छान होता

ना कुण्याही वनचराचा त्रास मजसी
भुंकला तो पाळलेला श्वान होता

मिटवले सार्या जगाचे प्रश्न त्याने
भावकीचा तो तिढा आव्हान होता

भाळलो दु:खावरी मी एवढा की
भेटलेला शापही वरदान होता


२.
जो काळ क्रूर होता त्याचीच ढाल केली
मी काल वादळाला स्वप्ने बहाल केली

नव्हते कुणीच धजले रोकावया मलाही
माझ्याच सावलीने मागून चाल केली

मेली किती कळेना वणव्यात वनचरे ही
तू फुंकल्या बिडीची कोणी मशाल केली

सोसून घाव सारे ते वज्ररूप झाले
या या तरल मनाने मोठी कमाल केली

होतो फितूर आत्मा केव्हातरी तनाशी
हे सत्य ओळखोनी मी वाटचाल केली


३.
पाठी असून रखुमा, भक्तात दंग का ब्वा
काळ्या विठूस म्हणती, पांडूर - अंग का ब्वा

खातात ते अघोरी, घुमती आवाज भारी
आम्हास शिंक आली, की शिस्तभंग का ब्वा

सोळा सहस्त्र राण्या, सजले महाल वाडे
राधे तुझ्याविना तो, ठरला अपंग का ब्वा

छपन्न भोग झाले , ढेकर तरी न आली
माये तुझी चुलीची, भाकर खमंग का ब्वा

किणकिण बिल्वरांची, झंकार पैंजणांचा
येतो तुझा अबोला, छेडीत जंग का ब्वा

शांती हवी तुला तर, ती गाठ सोड आधी
इकडून सैल आम्ही, तिकडून तंग का ब्वा.


४.
मागे जयजयकार चालला आहे
चौखांद्यावर स्वार चालला आहे

वाटेलाही लाज वाटली थोडी
या वाटे तो फार चालला आहे

आप्तानाही रान मोकळे झाले
कंठाने मल्हार चालला आहे

जाळ्यामधुनी मुक्त जाहला "तो ' ही
केवळ हा उपचार चालला आहे

होवो अथवा काकस्पर्श ना होवो
या पिंडातुन पार चालला आहे

भाळी त्याच्या भस्म रेखिले होते
सरणावर संस्कार चालला आहे

भिंतीचा आधार चालला आहे
ओट्यावरचा भार चालला आहे



५.
भाववेडा छंद झाला पाहिजे
देह हा गुलकंद झाला पाहिजे

जेवढ्या निर्माल्य झाल्या पाकळ्या
तेवढा मकरंद झाला पाहिजे

ऊब दाटावी तनाच्या अंतरी
गारवाही मंद झाला पाहिजे

ढेकळावर ढाळ अश्रुंच्या सख्या
एक गोपीचंद झाला पाहिजे

एवढा मिसळून जावा रंग की
धोतरा जास्वंद झाला पाहिजे

लाख या दु:खात गेला जन्म हा
शेवटी आनंद झाला पाहिजे

- बाळ पाटील 

No comments: