शशीकांत कोळी : चार गझला


१. 
फुलांच्या कत्तली झाल्या पुढे मग जन्मले अत्तर
सुगंधी ढाळले अश्रू कळ्यांनी कैक पानावर

जुन्या भिंती जुना वाङा जुने आहे किती छप्पर
जुन्याचा अंत व्हावा अन नवे जन्मास यावे घर  

जरी केलास बोभाटा भुकेच्या सांत्वनाचा तू
कुणी देणारही नाही तुला ताटातली भाकर

धनाची लाभली पेटी मला माझ्या नशीबाने
किती श्रीमंत झालो मी मुलीचा बाप झाल्यावर

सखे उन्मत्त वाऱ्याला दिशा बदलायला सांगू
तुझा ढळता पदर तू काळजीने एकदा सावर

उन्हाचा सातबारा सावलीने टाळला होता
म्हणे ती दावते आहे तिचाही हक्क सूर्यावर

२. 
जो माझ्यामध्ये आहे तो नाही माझ्यामध्ये
की राहत आहे कोणी दुसराही माझ्यामध्ये

मी गुलाब होउन जगलो काट्यांनी फसगत केली
रुतलेला एक गुलाबी काटाही माझ्यामध्ये

एक दिवस होइन वादळ मी साऱ्या दुनियेसाठी
घोंगावत असतो कायम वाराही माझ्यामध्ये

कसे मारले कुणी मारले खून कुणाचा झाला
हा सुरू कशाचा आहे खटलाही माझ्यामध्ये

हृदयाने  निश्चय केला मेंदूने नाही म्हटले
अपमान कितीदा झाला माझाही माझ्यामध्ये

या जगास बदलवण्याची मी शपथ घेतली होती
पण,बदल कधी ना झाला थोडाही माझ्यामध्ये


२. 

सुगावा लागला होता तुझा आधीच डोळ्यांना
तुला पाहू न शकलो खंत आहे हीच डोळ्यांना

किनाऱ्यावर अचानक वाढले याच्यामुळे पाणी
रिते केले किनाऱ्यावर तुझ्यासाठीच डोळ्यांना

इथे मी पापण्यांवरती दिला ताबा असा काही
निरंतर वाहण्याची लागली घाईच डोळ्यांना

तुझ्याइतके मला पूर्वी कुणी सांभाळले नाही
तुझ्यानंतर कसे व्हावे भिती याचीच डोळ्यांना

तुझ्यानंतर तुझ्या वाटेवरी नुसत्या दिल्या हाका
तुझ्याइतकी कुणाची ओढही नाहीच डोळ्यांना

मला डोळ्यातुनी माझ्या कुणीही वाचले नाही
कुणी वाचेल तर वाचेल मग आईच डोळ्यांना

मला दिसले असे काही तुला जे वाटले नाही
पुढे नशिबातही आले तुझे नाहीच डोळ्यांना


३.
फुलांचा खून करतो वाहतो पायात देवाच्या
किती तू पाप साठवले उगा नादात देवाच्या

अशाने फार तर होइल तुझाही देव दगडाचा
तुलाही डांबुया का सांग देव्हाऱ्यात देवाच्या

जगाला वाटते मूर्ती, तिथे माणुस उभा आहे
कुणी जाऊन हे सांगा तरी कानात देवाच्या

भयानक वाटला होता तुझा बंदिस्त गाभारा
गुदमरू लागली मूर्ती तिथे घरट्यात देवाच्या

किती केले नवस केले किती उपवास हट्टाने
जगाया लागलो आपण किती धाकात देवाच्या

कुणी मूर्ती कुणी पाया कुणी मंदिर उभे केले
तरी का लागली सांगा कपाळी जात देवाच्या


४.
जवळ गेलोच आहे मी तिच्या या कारणासाठी
तिने स्वीकारले आहे मला फेटाळण्यासाठी

अशी केली तिनेही आखणी अलगद फसत गेलो
असा मेलो जगाला वाटले मेलो तिच्यासाठी

मला सोडून जाताना तुला मी पाहिले होते
अता परतून तू माझ्याकडे आली कशासाठी

कसा लपवू जगापासून मी माझ्याच डोळ्यांना
तिने अश्रू दिला आहे मला सांभाळण्यासाठी

नको दावूस तू रस्ता नभाचा पाखरांना या
थवा हा जन्मला आहे नभी झेपावण्यासाठी

तुझ्या पायात जर का चांदणे आलेच टिमटिमते
हवा तो घे तुला तारा उरी कवटाळण्यासाठी

दगड इतके म्हणाला हेच आहे शल्य दगडाचे
कुणीही वापरत आहे मला भिरकावण्यासाठी

तसाही राबला नाहीच तोही राबण्यासाठी
दिवसभर राबला 'बाबा' मुलीच्या खेळण्यासाठी

-शशिकांत कोळी(शशी)

No comments: