खरे ते सांग ना सारे नको मारूस तू चाटा
तुझा सांभाळतो आहे कधी पासून मी डाटा
तुझा सांभाळतो आहे कधी पासून मी डाटा
तिच्या मी जीव जीवाला कधीकाळी दिला होता
मला पाहून ती करते अता लांबूनिया टाटा
मला पाहून ती करते अता लांबूनिया टाटा
कळू नाही दिले कोणा तुझ्यामाझ्यातले काही
अता झालाच आहे तर करू दे त्यांस बोभाटा
अता झालाच आहे तर करू दे त्यांस बोभाटा
कपारी अन् कडे केले किती मी पार अनवाणी
अता ह्या गालिच्याने बघ सले पायातला काटा
अता ह्या गालिच्याने बघ सले पायातला काटा
लळा बागेस ह्या माझा असावा लागला ऐसा
दिले जाऊ न काट्यांनी फुलांनी रोखल्या वाटा
दिले जाऊ न काट्यांनी फुलांनी रोखल्या वाटा
मनीच्या हेलकाव्यांचा न लागे थांगही कोणा
थिट्या त्याहून ह्या साऱ्या सुनामी सागरी लाटा
थिट्या त्याहून ह्या साऱ्या सुनामी सागरी लाटा
बघा धर्मांध आगीने जळू लागेल ही सृष्टी
इथे मग रोज ऐकाया पुढे येईल सन्नाटा
इथे मग रोज ऐकाया पुढे येईल सन्नाटा
जगाया वेगळे याहूनही लागे मला काही
जगायाला पुरेसा हा जरी आहे शिधा आटा
जगायाला पुरेसा हा जरी आहे शिधा आटा
कुणी काहीच मुद्द्याचे जराही बोलले नाही
नि मी येताच मुद्द्यावर जगाने फोडला फाटा
नि मी येताच मुद्द्यावर जगाने फोडला फाटा
नसे श्रीमंत कोणी अन् दरिद्रीही कुणी जेथे
असे कोणीतरी आता उद्याचे चित्र रेखाटा
असे कोणीतरी आता उद्याचे चित्र रेखाटा
उपेक्षा सोसली ज्यांनी कधी पासून काळाची
मिळाला पाहिजे त्यांना तयांचा नेमका वाटा
मिळाला पाहिजे त्यांना तयांचा नेमका वाटा
२.
वाटते अवघ्या जगा रूप सुंदर लेक तू
राहिले, समजू नको मात्र हे जग नेक तू
राहिले, समजू नको मात्र हे जग नेक तू
शेकडो बसलो जरी उत्तरे उकलून मी
आजही छळतो परी प्रश्न केवळ एक तू
आजही छळतो परी प्रश्न केवळ एक तू
एक पागल हिंडतो या नव्या शहरी तुझ्या
पाहिले असशील गे! या समान अनेक तू
पाहिले असशील गे! या समान अनेक तू
कोरल्या दगडापरी कोरडा बघ राहिलो
एकदा मज घालना श्रावणी अभिषेक तू
एकदा मज घालना श्रावणी अभिषेक तू
पेरतो विष आपुल्या सारखा जगण्यात जो
त्यास ह्या जगण्यातुनी एकवारच फेक तू
त्यास ह्या जगण्यातुनी एकवारच फेक तू
साजरे करतोस तू नित्य उत्सव हर्षुनी
टाळला बघ पाहिजे यातला अतिरेक तू
टाळला बघ पाहिजे यातला अतिरेक तू
बोलता चुकुनी कधी नाव ये अधरावरी
ठेवले स्मरणी मला आजही बहुतेक तू
ठेवले स्मरणी मला आजही बहुतेक तू
जाहली भवतालची षंढ ही जर माणसे
एकदा पण हो अता वादळी उद्रेक तू
एकदा पण हो अता वादळी उद्रेक तू
वाटते भय मानवी आकृती बघता कुठे
फक्त तो नर की कुणी तेवढे कर चेक तू
फक्त तो नर की कुणी तेवढे कर चेक तू
पेटती अजुनी चिता रोज आखर आंगणी
वाटले तर भाकरी रोज त्यावर शेक तू
वाटले तर भाकरी रोज त्यावर शेक तू
३.
ज्यांना छळायच्या रानामध्ये भुका
त्यांनीच घेतल्या हातात बंदुका
त्यांनीच घेतल्या हातात बंदुका
संघर्ष आमुचा अद्यापही सुरू
सल्ला देऊ नये आम्हा कुणी फुका
सल्ला देऊ नये आम्हा कुणी फुका
जातील येथली मौनात माणसे
तेव्हा तरी गड्या राहू नको मुका
तेव्हा तरी गड्या राहू नको मुका
ज्याचे दिसू दिले नाही शरीरही
स्वर्गा सदेह तो गेला म्हणे तुका
स्वर्गा सदेह तो गेला म्हणे तुका
कोणीच पाहिली नाही कशी सुगी
दुष्काळ पाहिला ओला कधी सुका
दुष्काळ पाहिला ओला कधी सुका
समृद्ध वाटती ज्यांना परंपरा
खोलून पाहिल्या त्यांनी न संदुका
खोलून पाहिल्या त्यांनी न संदुका
देण्या हिमालयाला मानवंदना
उन्मत्त टेकड्यांनो लाजुनी झुका
उन्मत्त टेकड्यांनो लाजुनी झुका
ही तापती हवा हे प्रश्न पेटते
तैसेच ठेउनी जातील पादुका
तैसेच ठेउनी जातील पादुका
४.
आहे विचारणारा माझ्याशिवाय कोणी
हे देशप्रेम केले जातीनिहाय कोणी
हे देशप्रेम केले जातीनिहाय कोणी
पैदा हजार केली भांडावया निमित्ते
हे धर्म पंथ जाती अन् संप्रदाय कोणी
हे धर्म पंथ जाती अन् संप्रदाय कोणी
तावून रोज येते भांडे जसे दुधाचे
नेते कसे कळेना काढून साय कोणी
नेते कसे कळेना काढून साय कोणी
त्यांच्या सदा सदिच्छा होत्या उदंड पाठी
केला म्हणून नाही साधा उपाय कोणी
केला म्हणून नाही साधा उपाय कोणी
'आई मिसिंग आहे' तक्रार नोंदली अन्
तीर्थाटनात आला सोडून माय कोणी
तीर्थाटनात आला सोडून माय कोणी
आराम सोसवेना अन् चैनही पडेना
केला मला असावा ऐसा अपाय कोणी
केला मला असावा ऐसा अपाय कोणी
शेणामुतात ज्यांची सारी हयात गेली
त्यांना जिणे सुगंधी देईल काय कोणी
त्यांना जिणे सुगंधी देईल काय कोणी
जे पाळतात कुत्री देशी तशी विदेशी
सांभाळली तयांच्यापैकी न गाय कोणी
सांभाळली तयांच्यापैकी न गाय कोणी
माझ्या प्रबुद्ध वाटा रोखावयास आहे
पायावरी उभा हा देऊन पाय कोणी
पायावरी उभा हा देऊन पाय कोणी
मी शाप अन् शिव्यांना घालीत भीक नाही
मेला कधीतरी का लागून हाय कोणी
मेला कधीतरी का लागून हाय कोणी
ह्या न्याय देवतेने केलेत जे निवाडे
मानून चालताहे त्यालाच न्याय कोणी
मानून चालताहे त्यालाच न्याय कोणी
५.
सबंध देश हा मला भयाण भग्न वाटतो
दुभंगला उरी जणू अशांत रुग्ण वाटतो
दुभंगला उरी जणू अशांत रुग्ण वाटतो
असेल स्त्री लहान थोर वा तशीच अन्यही
तिचा परंपरेस मात्र देह नग्न वाटतो
तिचा परंपरेस मात्र देह नग्न वाटतो
मनातले दिसू दिले कधी न चेहऱ्यावरी
म्हणून वंचनेतही विलासमग्न वाटतो
म्हणून वंचनेतही विलासमग्न वाटतो
तुवा न पाहिले अजून पंगती पल्याडचे
दरेक सोहळा तुला म्हणून लग्न वाटतो
दरेक सोहळा तुला म्हणून लग्न वाटतो
उदात्त मांडतो विचार भाषणामधून तो
नि धर्म पंथ जात भेद हेच विघ्न वाटतो
नि धर्म पंथ जात भेद हेच विघ्न वाटतो
दिगंत सापडूनही तुझे न बोट सोडले
तरी स्वतःस आजकाल मी कृतघ्न वाटतो
तरी स्वतःस आजकाल मी कृतघ्न वाटतो
- सिद्धार्थ भगत
No comments:
Post a Comment