प्रा. मनोज सोनोने : चार गझला



१ .
होईल शक्य तितकी, ठेवा जपून नाती.
नशिबात शेवटाला आहे 'अखेर' माती.

भाषा असो निराळी, वा धर्मही निराळा
वणव्यात जीवनाच्या जळतात फक्त जाती.

पक्षी हवेत उडतो, ठेवून लक्ष खाली
तैसीच माणसा तू मिळवून ठेव ख्याती.

आयुष्य छान आहे, उपयोग छान व्हावा
जैसे जळून येथे देती उजेड वाती.

कमवून ठेव लाखो, वा ठेव तू करोडो
तू आणले न काही नेशील काय हाती.


२.                

का हे वेडे लागत नाही मन.
दुःख पचवते बोलत नाही मन.

हसण्यावरती नेते दुःखाला
उगीच रूसणे जाणत नाही मन.

खूप परीक्षा घेतो हा संयम
पण त्यालाही मानत नाही मन.

एकांताच्या तर कुशीत शिरते
आनंदाने नाचत नाही मन.

बाजू घेते वारंवार तुझी
माझे काही ऐकत नाही मन.


३.
नेहमी माझा तुझ्याशी वाद होतो.
वाद झाला की कुठे संवाद होतो.

हा कसा रे खेळ आहे ह्या प्रितीचा
सारखा माणूस हा बर्बाद होतो.

भेटण्या येतेस की भांडावया तू
प्रश्न माझा आसवांची खाद होतो.

आणखी वागू तुझ्याशी सांग कैसा
तू गुन्हा करतेस मी प्रतिसाद होतो.

तू हवे तर बोल माझ्याशी नव्याने
भावनांचा खोल हृदयी नाद होतो.

वेदना होतात मजला अन् तुलाही
हासते जग मी अशाने बाद होतो.
        
४.
काडी-काडी जोडत गेलो तेव्हा कोठे भारा झाला.
पोटाला बसला चिंबोरा तेव्हा कुठे निखारा झाला.

दुःखाने नाचत होता फांदीवरती मोर एकटा अन्
तू म्हणालीस मजला सुंदर  आहे किती पिसारा झाला.

आंकाक्षांचे खोपे बांधत होतो ह्रृदयाला मोठे मी
त्यावर फुटक्या ह्या नशिबाचा वेळोवेळी मारा झाला.

पोट भरत नाही दोघांचे त्यात मला हा मुलगा झाला
लोक म्हणतात मजला जगण्यासाठी एक सहारा झाला.

रंग उडाला भिंतीचा अन् निघालेत हे पोपडे किती
सांगायाला काॅलमचे घर माझा मस्त निवारा झाला.

                                    

No comments: