स्वाती यादव : चार गझला




१.
कोंडते पानाफुलांचा श्वास हे माझे शहर
का स्वतः लावून घेते फास हे माझे शहर

स्वप्न  आशा ठेवते कामास हे माझे शहर
शक्यतांच्या शक्यतांचे भास हे माझे शहर

चेहरा ना मोहरा याला कधीही लाभला
फक्त आभासातला आवास हे माझे शहर

चित्र हे जे दाखवे तेही खरे आहे कुठे
की कुणा देते सुखाचा घास हे माझे शहर

चालणारे फार थोडे पाहिले आहेत मी
भिंगरी का लावते पायास हे माझे शहर

प्रश्न गावाला पडावा काय ह्याने मिळवले
केवढा करवून घे  सायास हे माझे शहर

बेगडी इथले जिणे अन कोरड्या या भावना
गोठत्या संवेदनांचा -हास हे माझे शहर

गावचा ना येथला उपराच मी दोन्हीकडे
सत्य का सांगून जाते खास हे माझे शहर


२.
आत ना हे थांबते उंडारते बाहेर मन
नेमके घाईत धरते आठवांचा फेर मन

लपविता आली कुणाला एकही ना भावना
हृदय मेंदूच्या वरी का नेमलेला हेर मन

वेदने दुःखासवे येतेस हक्काने इथे
वाटते का काय तुजला आपुले माहेर मन

एवढे सुंदर मला काहीच कोणी ना दिले
वाटते आहे घराण्याने दिला आहेर मन

ऐकणाऱ्या वाचणाऱ्यांची कळी खुलते अशी
केवढा व्यामिश्रतेने योजलेला शेर मन

३.
कुठे काय माझे चुके ते कळेना
कसे भाग्य माझे सुखाशी जुळेना

किती शोधले मी दिशातून दाही
कुणीही तुझ्यासारखा आढळेना

किती आर्त होऊन देतेय हाका
तरी ती बघाया जराही वळेना

ऋतू आसमंती नव्याने निघाला
तरी पान चाफ्या तुझे का गळेना

जरी घातली झूलही भरजरी मी
तुझे फाटके वस्त्र काही टळेना

अशी जाहलेली सवय वेदनेची
नवी कोणतीही जखम भळभळेना

जिथे एक रस्ता पुढे दोन फाटे
तिथे मार्ग माझे तुझे वेगळे ना

किती घाव केलेस आजन्म दैवा
तरीही उभी मी कधी कोसळेना


४.
कोणता आहे ऋतू हा वेगळा
की असे हा एकट्याचा सोहळा

भास की ? आहेस तू? की सावली?
छळत आहे प्रश्न केवळ बावळा

जो अडकला तो सुखाने राहतो...
हा कुणी रचलाय असला सापळा...!

प्रश्न रंगाचाच असतो नेहमी
कावळा ठरतोच कायम कावळा

हासती पाहून झाडे खालची
स्पर्शिला मी मेघ आहे सावळा

मी तुझ्या वारीस आले जर कधी
सोहळा होईल ना तो आगळा

No comments: