अशोक भांबुरे : पाच गझला



१.
भाव होते प्रेम होते टाळले का मी तरी ?
गाव माझ्या अंतरीचे जाळले का मी तरी ?

वाट माझ्या भावनांची मीच होती रोखली 
आसवांचे चारमोती गाळले का मी तरी ?

माय-बापाची प्रतिष्ठा थोर तेव्हा वाटली
त्याच खोट्या इभ्रतीला भाळले का मी तरी

प्रेम का नाकारले मी ते कळेना आजही
शब्द साधे एवढे ते पाळले का मी तरी ?

प्रीतिच्या ग्रंथात माझे नाव नव्हते नेमके
पान माझ्या जिंदगीचे चाळले का मी तरी ?


२.
तुझा भावला स्पर्श श्वासातला
जपू छान ठेवा प्रवासातला

तुझ्या प्रीतिचा परिघ मोठा जरी
दिसेना कुठे टिंब व्यासातला

मरूही सुखाने मला देइना
तुझा रेशमी दोर फासातला

खरी गोष्ट का ही तुला पाहिले ?
पुन्हा चेहरा तोच भासातला

फुलातील गंधात न्हातेस तू
कळे अर्थ आता सुवासातला


३.
माझ्याच सावलीला फसतो कधी कधी
पाहून सूर्य मजला हसतो कधी कधी

हा आरसा बिलोरी मज सत्य सांगतो
मी चेहर्‍यात माझ्या नसतो कधी कधी

बाहेर चांदणे हे आहे टिपूर पण
नाराज चंद्र घरचा असतो कधी कधी

टाळून संकटांना जाणार मी कुठे
त्यांच्याच बैठकीला बसतो कधी कधी

पाऊल शेपटीवर पडले चुकून तर
मी साप पाळलेला डसतो कधी कधी


४.
बाहेर मला घरट्याच्या पडताही नाही आले
पंखाना धाक असा की उडताही नाही आले

हे बांध घातले त्यांनी हुंदके अडवले होते
डोळ्यात झरे असतांना रडताही नाही आले

या काळ्या बुरख्या मागे मी किती दडवले
अश्रू पुरुषांची मक्तेदारी नडताही नाही आले

धर्माचे छप्पर होते जातींच्या विशाल भिंती
मज सागरात प्रीतीच्या बुडताही नाही आले

या गोर्‍या वर्णाचीही मज भिती वाटते आता
त्या अंधाराच्या मागे दडताही नाही आले

वरदान मला सृजनाचे नाकार कितीही वेड्या
खुडण्याचे धाडस केले खुडताही नाही आले


५. 
शब्दास जागण्याचा त्याचा करार होता
देऊन गोड वचने झाला फरार होता

आयुष्य हे कशाला खुंटीस टांगलेले मी
एकेक श्वास माझा बेजार फार होता

धर्मास भ्रष्ट केले दांभीक दानवांनी
देवासमोर झाला सारा प्रकार होता

ताडून पाहिली मी सारीच तर्कशास्त्रे
चांडाळ चौकडीचा तो कारभार होता

होता उजेड ज्यांना परवा प्रचंड प्यारा
त्यांनीच सूर्य केला चौकात ठार होता


- अशोक भांबुरे,
धनकवडी, पुणे.
मो. ९८२२८८२०२८, ८१८००४२५०६
ashokbhambure123@gmail.com

No comments: