नितीन भट : पाच गझला



१.
ओतू नका गड्यांनो आगीत तेल आता
जे वाचणार होते तेही जळेल आता

थोडी तरी करा रे चिंता अधोगतीची
काहीच होत नाही का आलबेल आता?

तू वाचतोस पाढा माझ्या पराभवाचा
मी काय काय केले दुनिया बघेल आता

जळतो चितेत माझा मृतदेह चंदनाचा
बघ मंद मंद त्याचा दरवळ सुटेल आता

आमंत्रणे दिली तू जाणून संकटांना
होतील वार जे जे हासून झेल आता

भिंती सुधारण्यातच आयुष्य खर्च झाले
कुठल्यातरी क्षणाला छत कोसळेल आता

एकेक जात इथली मागास होत आहे
काबिज करेल धरती ही जातवेल आता

उलथून टाक सारी ही बेगडी व्यवस्था
तू ठरवलेस तर ही पीडा टळेल आता


२.
झाला सुरू धरेचा उलटा प्रवास आता
माणूस माणसाचा घेईल घास आता

कुठल्याच औषधाने होणार ना बरा मी
लावू नकोस टेकू पडक्या घरास आता

माणूस फार माकडचाळे करीत आहे
इतकाच काय त्याचा झाला विकास आता

जे पेरलेस तू ते उगवेल एक दिवशी
नुसत्याच कल्पनेने का भ्यायलास आता

जाळाल का मला की पुरणार प्रेत माझे?
हा प्रश्न एकदाचा लावा धसास आता

ठरवून पाश सगळे तोडून टाकले मी
जो काय व्हायचा तो होईल त्रास आता

प्रत्येक माणसाचा 'खाक्या' जिवंत आहे
मी दाखवू कुणाला माझी मिजास आता?

मागे कधीच आहे मी प्राण त्यागलेला
मग का जितेपणाचे होतात भास आता?

येतो ऋतू फुलांचा तीही तशीच येते
बघ तोच ओळखीचा येईल वास आता


३.

मिटव जर शक्य झाले तर
तुझ्या माझ्यातले अंतर

किती नवजात दिसते बघ
जखम खपली निघाल्यावर

गुन्ह्याआधी ठरव मित्रा,
कुणावर फोडशिल खापर?

दगड होवोत हे डोळे
नको हा रोजचा पाझर

दिले तू पोट पण देवा,
विसरला द्यायला भाकर

पुन्हा माणूस प्राण्याचे
बनाया लागले वानर

मला पेरायची आहे
कडू शब्दांमध्ये साखर

जरी बाहेर राजा मी
घरी पत्त्यातला जोकर

तुझ्याआधी कुणी नव्हते
कुणी नाही तुझ्यानंतर


४.

कुणी शस्त्र जोवर उपसणार नाही
तसे चित्र काही बदलणार नाही

किती रक्तबंबाळ करशील माथा?
तुझा देव दगडी पिघळणार नाही

चला जाऊया गलबल्याच्या ठिकाणी
मनातील कल्लोळ छळणार नाही

अशी तू सडेतोड दे उत्तरे की
पुन्हा प्रश्न इतका चिघळणार नाही

चला पाळ बांधू मनाच्या दरीला
पुन्हा आत कोणी ढकलणार नाही

जरा विस्कटू द्या घडी जीवनाची
तसे फार काही बिघडणार नाही

कितीही बनव गगनचुंबी इमारत
तिचे भूस्खलन मात्र टळणार नाही

५.

लागू नकोस नादी मी आगजाळ आहे
इथल्या भल्याभल्यांना माझा विटाळ आहे

जाऊ नकोस माझ्या भावूक चेहऱ्यावर
नाही शिजत कशाने मी तीच डाळ आहे

मृत्यू कधी कुणाला सांगून येत नाही
इतके कसे वधाचे धोरण मवाळ आहे?

जेथे दिसेल वरवर अलवार स्वच्छ पाणी
समजून जा तळाशी भरपूर गाळ आहे

डोळ्यातुनी बरसतो पाऊस रोज माझ्या
वातावरण मनाचे इतके ढगाळ आहे

हे कोण बोलले की झाली फुले शिव्यांची?
हे बोलणे कुणाचे इतके मधाळ आहे?

थकशील कोरुनी तू वैधव्य रोज भाळी
सौभाग्यवंत माझे इतके कपाळ आहे 

■ नितीन भट
२०३, साईकृपा सहनिवास,
विजय कॉलनी, रुख्मिणीनगर, अमरावती - ४४४६०६
(मोबाईल - ९८५०९५१८१४)
Mail id : nitinbbhat@gmail.com

No comments: