किरण डोंगरदिवे : दोन गझला




१.   
कशी व्याकूळ रडली पहा आज भिडे वाड्यातील शाळा
कशी पटनोंदी विना बंद झाली वस्ती तांड्यातील शाळा

कधी लागला सांगा त्या कुपोषणाच्या अहवालाचा ताळमेळ
म्हणे आजकाल खिचडीपुरतीच भरते खेड्यातील शाळा

मध, डिंक आणि करवंदात अडकले काटेरी बालपण…
मोळीच्या ओझ्याने मानेत वाकली आदिवासी पाड्यातील शाळा

मिरवणूक निघते पारावर जेव्हा शाहू फुले आंबेडकरांची
बालकांच्या हातांनी बेफाम वाजत असते डफड्यातील शाळा

टँकरचा हॉर्न वाजला जेव्हा दुपारी गावाच्या त्या वेशीवर
पिण्याच्या पाण्यासाठी डुचमळली डोक्यावरच्या घड्यातील शाळा

नवा आसूड घेऊनच या पुन्हा सावित्री संगे ज्योतिबा तुम्ही
अन्‌ नव्याने घडवा पुन्हा ह्या सरकारी माड्यातील शाळा.   

 २. 
तुझ्या हुंड्याचा प्रश्न जिवाला पडलाय पोरी
पीक नसल्या शेतात गळ्याला लावतोय दोरी..

जगलो अन जगवलं तुम्हाला होईल तसं
मात्र केलं नाही पाप केली नाही चोरी

फाटक्या लुगड्यात घालवलं सारं आयुष्य
त्या तुझ्या मायचे आसू पुसशील ना पोरी?

सरणाच्या खर्चाचा नको घोर करू बाळा
धुर्‍यावर फोडून ठेवल्यात केंव्हाच दोन बोरी

पडीक जमीन सारी जप जमेल तशी
मातीच्या लेकराची लेक म्हणे नसो गोरी

- किरण डोंगरदिवे

No comments: