अश्विनी विटेकर : तीन गझला


१  .
आग का मी पाखडावी पावसावर 
जीव जडला जर तळपणा-या उन्हावर

विरळ होते चांदणे जेंव्हा नभीचे
भेट चंद्रासारखा मग तू छतावर

काळ थोडा लोटल्यावर जखम भरते 
मिटत नाही कोरले जे काळजावर

प्रेम करणे हा गुन्हा नाही तसा, पण 
घाव होतो प्रेम केले जर कुणावर

भार सोन्याचा तुला देवा किती रे 
भेट , ते गरिबात सारे वाटल्यावर

रात्र तर सरते तुझ्या स्वप्नात माझी 
श्वास घेवू दे न डोळे उघडल्यावर

२.
वेदनेचे शेत आहे
दुःख ताजे देत आहे

कर सुशोभित स्वर्ग देवा
बाप माझा येत आहे

ठेव ताबा तू , तुझ्यावर
गंध वारा नेत आहे

जीव देते हसत मी... तो
श्वास माझा घेत आहे

सावरावे आपले मन
फसवण्याचा बेत आहे

का म्हणावे देव त्याला
संकटे तो देत आहे

३.
का मन इतके हळवे झाले
घाव नव्याने ताजे झाले

संकट इतके मोठे नसते
अवडंबर पण त्याचे झाले

अोझे हे श्वासांचे असते
पण काैतुक शरिराचे झाले

कळली वार्ता गावोगावी
मन माझे कोणांचे झाले

श्रावण बरसेना आता
हे डोळे घर त्याचे झाले

- अश्विनी विटेकर

No comments: