पूजा फाटे : पाच गझला


१.
बाज माझा मला वेगळा वाटतो
जखम सण, घाव मज सोहळा वाटतो...

मी अशी चाखली जिंदगानी जरड
की अताशा सुरा कोवळा वाटतो...

द्रौपदी हात जोडून आहे उभी
आजचा कृष्ण का आन्धळा वाटतो...?

दोन शब्दातले बोलणे आपले
लोक फसतात त्यांना लळा वाटतो...

बासरी वाजली आर्त का एवढी?
राधिकेचा रिकामा गळा वाटतो...

कृष्णमय जाहला उगवतांना ज़रा
सूर्य तेजाळलेला निळा वाटतो...

साद देतात डोळे जरा लाजरे
चक्क आरोप की, सापळा वाटतो...!

मार्ग त्याने निवडला 'खरा' त्यामुळे
त्यास रस्ता इथे मोकळा वाटतो...!


२.
आज झाला हा किती रक्ताळलेला,
आरशाने चेहरा सांभाळलेला...!

तेज माझे नीटसे कळले न त्यांना,
काजवे बघण्यात जो तो गुंतलेला...!

एक आहे तृप्त आत्मा आत माझ्या,
देह हा त्याच्यामुळे संतापलेला...!

नम्रता राखून आहे फ़क्त मृत्यू
जीवना! तू का असा निर्ढावलेला..

एक इच्छा कोरडी उरते कशी जर,
रोज असतो एक प्याला संपलेला...!

कृत्य काळे, निंद्य चाळे, करुन सुद्धा,
का असावा  देव त्यांना पावलेला?

हो! जरासा बोलला तेव्हा निरर्थक,
त्यातही होता घसा ओलावलेला...!

का रडू मी सारखे या स्त्रीपणावर?
माज माझ्या आत मी जोपासलेला...


३.
उन्हाला सावली म्हणणे बरे नाही बरे नाही,
धगीवाचून हे जळणे बरे नाही बरे नाही....!

तुला विसरायचे होते असे नाही परंतू, मी
तुला दररोज आठवणे बरे नाही बरे नाही...!

उगवतो हा दिवस केव्हा मला ना थांग ना पत्ता,
असे रात्रीस जागवणे बरे नाही बरे नाही...!

खरोखर श्वास अडखळतो, बटांना मोकळे कर तू,
स्वतः निसटून गुंतवणे बरे नाही बरे नाही...!

तुला बघताच सगळे नाव माझे घेत असताना,
असे गालातले हसणे बरे नाही बरे नाही...!

समेवर ये जरासा मैफलीला गोठवू आपण,
सदा मौनात गुणगुणणे बरे नाही बरे नाही...!

खरे आहे जरा मी भाव खाते रे ब-यापैकी,
जरासा भाव ना देणे बरे नाही बरे नाही...


४.
कपाळ माझे कोरडवाहू
कुंकू त्यावर कशास लावू?

चांदणभरल्या रातीलाही
खारटल्या डोळ्यांनी पाहू

ज्या दर्याच्या लाटा खूनी
होडी त्यातच घेऊन जाऊ

सोडू नाशिबावर नात्याला
आपण दोघे सुखात राहू

वैराग्याचे कुचके मनगट
संभोगाचे दणकट बाहू

शिव्याशाप खाउन झाल्यावर
बनू कोडगे भाकर खाऊ


५.
गोष्ट तुझी मज भावत आहे इतकी
एक कथा आश्वासक आहे इतकी

सारे सारे सारे काही मिळते
त्या डोळ्यांची दानत आहे इतकी

मी हो ला हो लावत जाते कारण
इच्छा त्याची माफक आहे इतकी

पक्षी सुद्धा फिरकत नाही तिकडे
एक डहाळी वाळत आहे इतकी

सौदा केला तू नात्यांचा, आता
लाज तुला का वाटत आहे इतकी?


६.
दोन देहांत तेजाळली शांतता
रात्र सरताच ओशाळली शांतता

मोगरा, केवडा अन जुई सोडुनी
आज केसात मी माळली शांतता

सांडला पारिजातक सकाळी तिथे,
ह्या इथे रोज गंधाळली शांतता

पाळले मी जरी मौन हे आजवर
आतल्या आत मी टाळली शांतता

त्या घरातील भिंतीस गेला तडा
एवढी आर्त किंचाळली शांतता

एक मेला पुढारी सुटीच्या दिनी
बेत बुडला, तरी पाळली शांतता

- पूजा फाटे

No comments: