रविप्रकाश चापके : पाच गझला



१.
दिसतो जरी कफल्लक..दिलदार बाप असतो.
किडनी  मुलाकरीता  विकणार  बाप असतो !

तो  स्पर्शताच  होई..  लोखंड  लख्ख  सोने.
आजन्म   पांघरुनी   भंगार   बाप  असतो !

स्वप्ने  बघे स्वतःची..डोळ्या मध्ये  मुलांच्या.
जन्मांधळा स्वतःचा दळणार  बाप असतो!

कडकीतल्या खिशांना का झांबले चिमुकली?
ठेवी खिशात चिल्लर..कलदार बाप असतो !

आता  गडे  परीक्षे  , नापास   तूच   व्हावे..
कॉपी मुलास पुरवी... हुश्शार  बाप असतो!

'कॉम्प्लेन बॉय' जेव्हा  पडतात  धावतांना..
दिव्यांग पाय घेवुन  पळणार  बाप असतो !
 
तो राबतो असा की , थकव्यास लाज वाटे.
घामासही  सुगंधी  करणार  बाप  असतो !


२.
तुझ्या आसवांनी , भिजव पावसाला.
तुझे नेत्र दाखव....रडव  पावसाला!

किती छान रिमझिम तुझ्या आसवांची?
बरस तू खुशीने , चिडव  पावसाला !

बघू , अश्रु धो धो..कि  पाऊस धो धो?
उचल नेत्र-गंगा...भिडव  पावसाला !

तुझ्या रिक्त प्याल्यात पिळतोय डोळे..
अधाश्या प्रमाणे   रिचव  पावसाला !

दुरुनी  चिडवण्यात  असते नजाकत.
सिगारेट दाखव... झुरव  पावसाला !


३.
गेला उगाच नाही...  दंगा  करून चंद्र.
शहरात मिरविला मी गाडी वरून चंद्र!

डोळ्यास झोप नाही स्वप्नासही उपास.
तू पहिला कशाला  डोळे  भरून चंद्र?

पाणी तहानल्यांना पाजाल जर सदैव..
राहील रोज तुमचा प्यालाभरून चंद्र !

आले कसे कळेना हे चांदणे उन्हात ?
सुर्या मधे कसा रे  बसला लपून चंद्र ?

माझ्याच आसवांचे  हे चांदणे नभात..
ओवाळ अंबरा तू  माझ्या वरून चंद्र !

बाहेर मायबापा  काढू  नको मुलीस -
शहरात बोंब झाली,निघतो घरुन चंद्र!

ऐटीत सूर्यबिंदी ती  लावते झक्कास..
वाणात वाटते मग ओटी भरून चंद्र !

आयुष्य....चंद्रगोष्टी  संपेल  ऐकण्यात.
छळणार मग चितेवर  साला दुरुन चंद्र!


४.
नुस्ताच बैसलो मी हाती धरून प्याला ..
रडणे महाग पडले गेला भरून प्याला!

देहात टंच मस्ती..डोळ्यात  मद्यशाळा;
माझ्याच प्रेयसीला बघतो जळून प्याला!

शुद्धीत राहण्याचा सारा अहम गळाला;
तो बोललाच ऐसा, हाती  धरून  प्याला!

मदमस्त आसवांची चाखा जरा खुमारी,
घ्या ना जरा सुखांनो..अश्रू भरून प्याला!

स्वप्नात देव मजला, छोटा रिचार्ज मागे..
देवास पाजला मी उष्टा करून  प्याला!

जर सोमरस मुखाला लावाल रामप्रहरी ?
उठवेल मध्यरात्री  मग खडबडून  प्याला!

गंगा पवित्र झाली ऐकून  शब्द  सुंदर...
'मी माळ घातली रे' म्हणतो हसून प्याला!

ज्वालामुखी हजारो..चषकात थंड झाले.
तृष्णेमधे स्वत:च्या जळतोअजून प्याला!

मद्यात मोक्षप्राप्ती..प्राशून पूण्य कमवा.
घ्या हिसकटून सारे देवा पुढून प्याला !

माझाच हाय मजशी संवाद होत नाही..
मध्यस्त ठेवला मी,हल्ली म्हणून प्याला!

किंकाळते तृषा ही 'अतृप्त जन्म गेला'..
मद्यास आग लागो..जावो जळून प्याला!

चिंताच माणसाला बसवे चितेवरी हो..
कसला विचार करता, घ्याना भरून प्याला!

टाहो कफल्लकांचा गगनात लुप्त झाला.
अन् सांडला धरेवर स्वर्गा मधून प्याला!


५.
हिणवू नका कुणीही अबला म्हणून नारी.
ना-या करी नराचा, करणी करून नारी!

सांगेल ती चुलीला कुठवर रडत ग-हाणे?
निघते घरून आता कंबर कसून नारी!

सासू छळे सुनेला....जावा नणंद वैरी.
नारीसही कळेना नारी असून नारी !

गर्भातल्या कळीला खुडतो वसंत आता,
ठेवाल कालचक्रा कैसी जपून नारी ?

माहेरच्या गुणांनी सासर किती चकाके..
घासून जन्म घेते भांड्यावरून नारी!

वारांगना कशाची? वीरांगणा म्हणा हो..
मन मारते स्वतःचे, तन अंथरून नारी!

नारी-पुराण हाती वाचावयास घेता ?
जाईल ब्रम्हदेवा डोक्यावरून नारी ?

पाऊस ऐनवेळी भलता उदास झाला...
भिजली कशीच नाही, इच्छा असून नारी !

- रविप्रकाश चापके


No comments: