महेन महाजन : पाच गझला



१.

प्रेम करण्या कुन्तलांना पांघरोनी रात कर..!
रातभर जळण्या खुशीने काळजाची वात कर !

दे जळू मजला सुखाने घेउनी तूही झडप..
मग पतंगाचा हवा तर पाहिजे तो घात कर..!

नांदण्या आनंद तुझिया बघ घरी येतो कसा..
दुःखितांच्या स्वागताचा सोहळा दारात कर..!

लोक हे घेतील तुजला मग कडेवर नेहमी..
आतल्या ह्या 'मी' पणावर तूच आधी मात कर..!

टाळले होते जयांनी फाटके पाहुन तुला..
रोज आमंत्रित त्यांना तू समारंभात कर..!


२.
आजकालची शर्यत कासव जिंकत नाही..
ससा अताश्या आडोश्याला झोपत नाही..!

वादाचा तो मुद्दा करतो चर्चेलाही..
भांडायाची एकहि संधी सोडत नाही..!

आई माझी सुगरण नव्हती फार तरीही..
तिच्या हातची चव अन्नाला लागत नाही..!

घरी नेहमी चालू असते तनफण घनगण
तरी बायको माझ्या आधी जेवत नाही..!

हटकुन यावे नयनी पाणी हसता हसता..
अश्रूंशिवाय सुखास कुठल्या किंमत नाही..!

आयुष्याच्या गळ्याभोवती विळखा आहे..
जिव गुदमरतो श्वास तरीही सोडत नाही..!


३.
तुझा रस्ता तुझ्या वाटा तुझी वणवण तुझा काटा..!
कुणीही पाहिले नाही.. फुका झालाय बोभाटा..!

अता सांगू कुणापाशी मनाची गूढ गार्‍हाणी..
इथे प्रत्येक विषयालाच जो तो फोडतो फाटा..!

जरी काळोख मजला हा मिळाला चांदण्या रात्री..,
इथेही ठेवला आहे प्रकाशाचा तुझा वाटा..!

समुद्राची किती खोली किनाऱ्याला नसे ठावे..
तयाला फक्त दिसती ह्या खिदळणाऱ्या खुळ्या लाटा..!


४.
तुझ्या नि माझ्या चिकार भेटी तरी मनाच्या रित्या पखाली.
जरा जरासा स्विकार केला जरा जराशी नको म्हणाली..!!

तुझ्या स्मृतींची कळी गुलाबी अजूनही काळजात आहे..
बघावयाची असेल तर तू निघून ये ह्या सुन्या महाली..!

नको उद्याची टुकार स्वप्ने तुझ्यासवे फक्त आज दे तू..
तुझ्यासवे मी हसून घेतो.. जगून घेतो जरा गुलाली..!

अधीर ओठी तुझेच गाणे तुझीच स्वप्ने 'महेन' बघतो..
तुझ्या प्रितीची नशा निराळी अदा तुझीही प्रभावशाली..!!


 ५.
                               
जगताना ह्या किती जिवाची फरफट झाली..?
काळजातल्या श्वासांचीही घुसमट झाली..!!

जो तो आता फक्त सुताने गळा कापतो..
माणुसकीची धार अताशा बोथट झाली..!

निधडी छाती समोर कर तू घाव झेलण्या..
रडता रडता मूठ कुणाची बळकट झाली..?

दुःख उश्याशी लाड कराया आले माझे..
कुशीतल्या मग आनंदाची घुसमट झाली..!

किती उशिर रे.. आयुष्या हा श्वास सोडण्या..
येताना तर तुझी तयारी झटपट झाली..!  


     

No comments: