स्वरूपा सामंत : दोन गझला



१.

माया ममता अर्थ समजला ती गेल्यावर
विव्हळता हुंदका अडकला ती गेल्यावर

तिच्याबरोबर वाद घातला अनेकदा मी
तिच्या सुरातच सूर मिसळला ती गेल्यावर

तिचा मार अन् तिच्या डागण्या शाब्दिक होत्या
तिचा वार प्रत्यक्ष बिलगला ती गेल्यावर

तिने निभावून नेले सगळे, सर्व सोसले
हिशोब चिंध्यांचा सापडला ती गेल्यावर

अ आ इ ई अक्षरओळख तिने शिकवली
आईचा मग अर्थ उमगला ती गेल्यावर


२.

मला पाठीवरी टोचतात काटे बाई फार
तुझ्या मोगरीच्या गजऱ्याला गुलाबी शहार

एक दागिना न ल्याले तरी लकाकून गेले
तुझ्या मला बघण्याला अशी सोनेरी किनार

पैल तुला बसवून ऐल अशी मी बसले
तुझी शेकोटीच्या वरताण माया उबदार

साडी चोळी आवरता माझी धांदल उडाली
तुझ्या पेंगुळल्या पापण्यांच्या हाका धारदार

आज दिवसभराची झाली दगदग भारी
माझ्या थकल्या मनाला तुझ्या कुशीचा आधार

No comments: