प्रभा सोनवणे : दोन गझला



१.  
मला सांगायचे आहे जरासे
इथे थांबायचे आहे जरासे

किती दुष्काळ सोसावा धरेने
अता बरसायचे आहे जरासे

नदीला पूर आल्याचे कळाले
तिला उसळायचे आहे जरासे

कधी बेधुंद जगताना मलाही
जगा विसरायचे आहे जरासे

मिळे सन्मान शब्दांना स्वतःच्या
तिथे मिरवायचे आहे जरासे

मला या वेढती लाटा सुनामी
मरण टाळायचे आहे जरासे



२.
आज रस्ते पावलांनाही छळाया लागले
दुःख माझे पत्थरांनाही कळाया लागले

सावलीचे झाड त्यांनी ठेवले नाही तिथे
घातलेले घाव सारे भळभळाया लागले

सर्प त्यांनी पाळलेले दंशती रस्त्यास त्या
ध्वस्त झाला गाव अन ते सळसळाया लागले

काल जेथे होत होते सप्तरंगी सोहळे
खानदानी तेच वाडे कोसळाया लागले

सांग तेथे कोण जातो आप्त सारे पांगले
फक्त त्यांना भास होतो वर्दळाया लागले

भंगलेल्या देवळाला उंबरा नाही "प्रभा "
देवतांचे तेज आता मावळाया लागले

- प्रभा सोनवणे

No comments: