निलेश कवडे : पाच गझला



१.
टोक द्वेषाचे कधी कोमल असू शकते...
वाहवा सुद्धा छुपी टिंगल असू शकते...

येत नाही शोधता हे वन्यजीवांना
राहिले शिल्लक कुठे जंगल असू शकते

राहतो चिंतेत जो, त्या माणसासाठी
शांतताही एक कोलाहल असू शकते...

ओघळत नाहीत गालावर तिचे अश्रू
पापण्यांखाली तिच्या दलदल असू शकते...

पाळतो आहे नियम संचारबंदीचे
आत मेंदूच्या सुरू दंगल असू शकते...

फक्त दृष्टीकोन बघण्याचा बदल मित्रा
बायकोसुद्धा तुझी 'ऐंजल' असू शकते...

सांगतो आहे मला कापूर जळणारा
भाग्य जळताना किती उज्ज्वल असू शकते...

बैठकीला तू हजेरी लाव नाहीतर
आजची चर्चा तुझ्याबद्दल असू शकते...

हादऱ्यांनी झोपडी माझी खचत नाही
फार तर गरिबीमुळे हतबल असू शकते...


२.
का बनवले ऐवढे कणखर मला ?
का फुटत नाही कधी पाझर मला?

आज रितसर एक सोडवले गणित
आणि आठवला जुना मास्तर मला...

श्वास आता मोजके उरलेत बघ
जीवना! सांभाळ ना तोवर मला...

हद्द मी ओलांडली नाही कधी
राखता आले म्हणुन अंतर मला...

खास पैशाची चमक असल्यामुळे
भेटतो आहे किती आदर मला...

एकदाचे काय ते ठरवून घे
आवडत नाही तुझे 'जर तर' मला...

रोज मी येणार सर, शाळेमधे
आणले आहे नवे दप्तर मला...

आजही दिसणार ना त्याला घरी
बाळ माझे शोधते घरभर मला...

गात 'जन गण मन' दिवस होतो सुरू
लाभले हे भाग्य शाळेवर मला...


३.
सारखे दिसते मला मृगजळ कशाला
वाळवंटाच्या घरी हिरवळ कशाला

चेहऱ्यावर बेगडी ओघळ कशाला
तीळ असल्यावर हवे काजळ कशाला

शोध घेतांना स्वतःचा का? कळेना
फक्त आठवते मला पिंपळ कशाला

पाहुनी गंगेस मजला प्रश्न पडला
मी म्हणावे नेमके निर्मळ कशाला

वाटले नव्हते तुला काहीच आधी
वार केल्यावर अता हळहळ कशाला

रोज तर कोणीच येथे येत नव्हते
आज आहे एवढी वर्दळ कशाला

नीट सांभाळू न शकले ग्रह स्वतःचा
पाहिजे आहे तरी 'मंगळ' कशाला

काल मी ज्याला शमवले संयमाने 
आज ते आले परत वादळ कशाला


४.
कधी जाणून डोळ्यांनीच घ्यावे शल्य डोळ्यांचे
जिभेला सांगता येते कुठे वैफल्य डोळ्यांचे

जशी मज पाहते आई तसे ना पाहते कोणी
किती दुर्मिळ इथे झाले खरे वात्सल्य डोळ्यांचे

शरण जाऊन बुद्धाला स्वतःच्या मी जवळ गेलो
स्वतःला शोधण्यासाठी हवे मांगल्य डोळ्यांचे

चुकी झालीच द्रोणाचार्य तुमची अंगठा मागुन
तुम्ही मागायचे होते मला कौशल्य डोळ्यांचे

हमेशा लेकरासाठी तिची धडपड सुरू असते
म्हणुन दुर्योधनाला लाभले जाज्वल्य डोळ्यांचे


५.
काय आहे नेमके, हृदयात सूर्याच्या...
दुःख जळते कोणते, गर्भात सूर्याच्या...

सारख्या मारून सूर्याभोवती फे-या
घालतो का? भर, शनी दुःखात सूर्याच्या...

उंच धांडा चालला, शेतात ज्वारीचा
भूक जळते का तिथे पोटात सूर्याच्या...

तह सलोख्याचाच ग्रह ता-यांमधे होतो
रात्र चंद्राला, दिवस हिश्यात सूर्याच्या...

बंड एका वेदनेचा अंतरी झाला
जन्मला संसार मग, स्फोटात सूर्याच्या...

दुःख सूर्यासारखे हृदयामधे जळते
बैसते ऐटीत दरबारात सूर्याच्या...

वेदनेचे तेज हे, की आणखी काही
वलय चंद्राला नवे, ग्रहनात सूर्याच्या...

घेतला मग पेट विझलेल्या मशालींनी
पाहिल्यावर काजवे सैन्यात सूर्याच्या...

ओढुनी धरती उन्हाचा पदर डोक्यावर
नाहते ती, केशरी रंगात सूर्याच्या...

No comments: