वसंत शिंदे : चार गझला


१.
धुंद तू नाच ना
एकदा जीवना

सोडुनी मौन हे
रे मना बोल ना

कोण बघु हारतो
होवु दे सामना

सांत्वना कोरडी
लोपली भावना

का अशी पाहते
रे तिला वासना

करुनिया दाखवा
का उगा घोषणा

श्वास का थांबला
संथ पण चाल ना


२.
डोळ्यांचीही भाषा आहे कळले नंतर
अश्रूंनाही वाचा आहे कळले नंतर

कुठे बोलतो आताशा मी मौनाशी या
मौनाचाही लोचा आहे कळले नंतर

डोळ्यांचा त्या नकार आला तरी मनाला
अजून थोडी आशा आहे कळले नंतर

ढासळून मी उभाच आहे अद्याप कसा
उरलेला हा ढाचा आहे कळले नंतर

असूनसुद्धा दोघांमधली दिसली नाही
दोघांमध्ये रेषा आहे कळले नंतर

एकसारखे दिसते आहे दुःख कसे हे
दुःखाचाही साचा आहे कळले नंतर

वाजत होता कानामध्ये जीवनभर तो
धूंद व्यथांचा ताशा आहे कळले नंतर


३.
जगण्यामध्ये आनंदाचे सारण थोडे भरून ठेवा
हसण्यासाठी दुःखाचाही सराव थोडा करून ठेवा

तुटेल केव्हा पायातळची फांदी सांगता येत नाही
आधाराला हातामध्ये दुसरी फांदी धरून ठेवा

घसा कोरडा पडेल नक्की चढताना हा डोंगर माथा
म्हणून व्यथांचा पिण्यासाठी कडवट पेला भरून ठेवा

कर्ज फेडण्या आयुष्याचे त्याला द्यावे व्याज लागते
मुदलाशिवाय त्याच्या हाती काही पैसे वरून ठेवा

जिंकायाचे असेल जर का कधी कधी लक्षात असू द्या
खेळ सुरू तो होण्याआधी डाव आपला हरून ठेवा


४.
रसरसलेला लाव्हा दिसतो ओघळणारा सूर्यावरती
जखम असावी भळभळणारी आभाळाच्या माथ्यावरती

भरलेल्या या घरातली स्त्री उदास का ती दिसते आहे
दळते रोजच गाणे गावुन दुःख कुणाचे जात्यावरती

पैशासाठी .. स्वार्थासाठी .. सोडुन जातो .. गळा कापतो
कसा भरोसा ठेवावा या ढासळणाऱ्या नात्यावरती

बाण टोचुनी घेण्यासाठी आतुरलेले दिसते का ते ?
सावज असुनी बहुदा त्याचे प्रेम असावे भात्यावरती !

हिंम्मत बघुनी लढणाऱ्याचा हृदयी ठोका चुकला होता
फुलपाखरूच बसले जेव्हा तलवारीच्या पात्यावरती

सर्व फेडले जरी जीवना कर्ज तुझे मी श्वास देवुनी
शिल्लक दिसते तरी कशी ही अजून माझ्या खात्यावरती

- वसंत शिंदे 

No comments: