नशा वेदनेची हवी तर चढू दे
सुखाचा जरासा उतारा मिळू दे
बिघडले किती बघ तुझ्या सोबतीने
जरा सावरू दे जरा आवरू दे
भिडव थेट डोळ्यास डोळे तुझे
अन भले मग कितीही मला गोंधळू दे
नको आज जाऊस चंद्रा घरी तू
मला जाग आहे तुलाही असू दे
भटकले कधी जर मला शोधताना
तुझ्या पावलांचा ठसा सापडू दे
फिका वाटतो सर्व श्रृंगार आता
तुझा तोच शेला पुन्हा पांघरू दे
जुनी खोड त्यांना नवे प्रेम अपुले
जळू दे जळू दे जगाला जळू दे
नको ना उगा कागदांचा पसारा
गझल ही तुझी ना?तुझ्यावर लिहू दे
इथे उंबरा तर तिथे भाव नडतो
नभाचा नभाशी किनारा जुळू दे
विचारू नको ना किती प्रेम आहे
मिठी बोलते जे मिठीला कळू दे
कशाला हवे शब्द भाषा कशाला?
इथे जाणवे जे तिथे जाणवू दे
२.
कुठली ना तक्रार तुझ्या येण्यावर दुःखा
दिले सोडुनी मी तुजला वा-यावर दुःखा
कळले जेंव्हा शक्यच नाही हातमिळवणी
तश्या फेकल्या जखमा मी माळयावर दुःखा
अता अता तर वाट तुझीही चुकते का रे?
सध्या तू नसतोस म्हणे ताळ्यावर दुःखा
छोट्याश्याही आनंदाला पंख दिले मी
त्याच क्षणी का आणलेस था-यावर दुःखा
पचनाला जड जाते वारेमाप पीक हे
सांग दळावे का तुजला जात्यावर दुःखा
गझल तुझी अन कवितासुद्धा तुझीच
होते हे झाले उपकार किती माझ्यावर दुःखा
फुलासारखा जपला नखरा वेळोवेळी
जीवन का आणले म्हणून काट्यावर दुःखा
आत्ता कोठे जुळली आहे मैत्री अपुली
करमणार मज नाही तू गेल्यावर दुःखा
घेऊ आता गळाभेट अन भांडण मिटवू
किती वागवू सांग तुला खांद्यावर दुःखा
३.
जाग जराशी होती तेंव्हा..काही मिसरे सुचले असते
लिहिली असती एक गझल अन ओठांवरती टिपले असते
प्रेम जरासे राग जरासा मी थोडीशी तू थोडासा
नात्याला चव आली असती अजून थोडे मुरले असते
एक कोपरा हळवा बिळवा एक वेदना नाजुक साजुक
ओंजळभर बस दान सुखाचे आयुष्याला पुरले असते
निरोपाविना शेवट झाला एका अर्थी बरेच झाले
डोळ्यांमधले चुकार अश्रू वाटेवर घुटमळले असते
मिठी जराशी सैल असू दे हातांची वा नात्यांचीही
अर्धे मुर्धे श्वास फुलांचे आत उगा घुसमटले असते
'आहेस कशी?' या प्रश्नाचा किती दिलासा तुजला सांगू
खुप काहीसे होते आणिक खुप काही बडबडले असते
बरेच झाले पाठ फिरवली..तू..मी..आणिक लोकांनीही!
नजरेमधले प्रश्न कधीचे दोघांनाही छळले असते
तुझाच आहे दोष खरेतर तुझीच आहे जादू सगळी
गुपीत अपुले या लोकांना सांग कशाला कळले असते?
घरटे होते छप्पर होते भिंती होत्या स्वप्नामध्ये
तुझ्या अंगणी काश पाखरू माझेही भिरभिरले असते
- योगिता पाटील
No comments:
Post a Comment