श्यामनाथ पारसकर : चार गझला



१.
नालायकीपुढे तू करणार काय बाबा?
सत्ता मुजोर तेथे लाचार न्याय बाबा.

त्या थोर पुस्तकांनी तत्त्वे कुठे हरवली?
सत्त्वास राखण्याचा नाही उपाय बाबा.

जगण्यास मोल कवडी,अब्रूस कोण गणतो ;
ठरते समानताही व्यक्तीनिहाय बाबा.

जातींमधेच सारे बांधव विभागले तर
ठरणार त्या प्रतिज्ञा अर्थाशिवाय बाबा.

स्वातंत्र्य लाभल्याला झालीत सात दशके,
शोधून काढ कोठे त्याची सराय बाबा.

मौनास जुंपल्याने चाले बरे सुशासन,
बघ हाय-फाय बनले ते वाय-फाय बाबा.


२.
तुझ्या वाड्यामधे नटखट किती उंदीर झाले रे ;
चला मोजा बरे झटपट किती उंदीर झाले रे.

कराया फस्त गोदामे निघे टोळी उमेदीने,
बघा ही केवढी लटपट किती उंदीर झाले रे.

नव्याने योजना काढा, बिळे शोधा कुठे त्यांची,
करा काहीतरी खटपट किती उंदीर झाले रे.

तिजोऱ्या पोखरुन काही पळाले दूर देशाला,
बडया बोक्याहुनी बळकट किती उंदीर झाले रे,

टगे लंगोट कुरतडती भिती ना लाज कोणाची,
मनुष्याहूनही हलकट किती उंदीर झाले रे.


३.
खास आपल्या आतिथ्याला चहा चांगला;
अमृताहुनी गोड मसाला चहा चांगला.

ज्यांना ज्यांना मोठे व्हावे असे वाटते,
मोठे होण्या विकावयाला चहा चांगला.

सर्व मंडळी चर्चेसाठी बोलवून घ्या,
नवे गिऱ्हाईक पटवायाला चहा चांगला.

लोक सभेला बरेच आले नको नको ते,
लवकर त्यांना कटवायाला चहा  चांगला.

चहासवे चल शिजवून घे तू नवी खलबते;
खर्च पचेना, पचवायाला चहा चांगला.


४.
दिसे बंधू भगिनींनो गडी हा खास कामाचा ;
परंतू बोलका राघो नसे कोण्याच कामाचा.

तुझ्या खात्यातली रक्कम दिसे लाखांवरी शिल्लक ;
नसे उपयोग वेळेवर तुला एका छदामाचा.

नव्या जाकीट-कोटाला म्हणाले फाटके धोतर ;
मला द्या दाम घामाचा, नको पैसा हरामाचा.

कसे स्वागत करुन घ्यावे मला तू सांग ती युक्ती,
जिथे जाशी तिथे होतो तुझा जयकार नामाचा.

बड्या थापा, बडी स्वप्ने ,खरे थोडे तरी बोला ;
कधीकाळी असे मित्रा तुझा हा देश रामाचा.

उडे खोगीर जादा की जरा जादा उडे घोडा ;
बघा तोंडास आहे का कुठे पट्टा लगामाचा.

- श्यामनाथ पारसकर

No comments: