प्रथमेश तुगांवकर : पाच गझला



१.
चंद्र आहे तुझा चांदण्याही तुझ्या
देत जाणे तुझे मागण्याही तुझ्या

कोणत्या सांग अश्रूत नाहीस तू ?
हुंदकाही तुझा..पापण्याही तुझ्या

दोष द्यावा फुग्याला कशाला कुणी
ही हवाही तुझी, टाचण्याही तुझ्या

उत्तरे जीवघेणी दिली जन्मभर
पान होते तुझे.. चाचण्याही तुझ्या

दोन पेल्यात दारू, चहा ओतला
गाळण्याही तुझ्या, वाटण्याही तुझ्या

आणि चोचीत उरली प्रतीक्षा पुन्हा..
सर्व कणसे तुझी, त्या कण्याही तुझ्या


२.
नेमके आहे कुठे माहीत नाही घर मला
पाय ओढीने किती नेतात हे भरभर मला..!

कागदांवरच्या नव्या..  मोजायचो रेषा जरी
दूर गेले बालपण सोडून बोटांवर मला

'तू कशी आहेस?' म्हणता, काय नक्की व्हायचे ?
का तुझा आवाज येतो त्या क्षणी खरखर मला

याचसाठी खाटकन केल्यात तोंडी बेरजा
द्यायची बदल्यात आई चिमुटभर साखर मला

मी असे केव्हातरी गणवेष घालुन पाहतो
त्यातला अद्यापही मी वाटतो सुंदर मला

चौकडा होती वही जी बाग अंकांची जणू
अंकही  बोलायचे  चिमटीमध्ये तू धर मला

बिलगुनी पूर्वी मनी माऊ म्हणत जो तो मला 
वाटते निष्पाप म्हणुनच चोरटी मांजर मला


३.
आला आला म्हणतो तोवर गेला पाउस
तिचा खरोखर झाला आहे चेला पाउस…

झेलत पाउस...  हातांचा खलबत्ता केला
मुठीत मीही बालपणी कुटलेला पाउस…

आत्ता येथे अंगणभर तर रांगत होता
लडिवाळाने कोणी उचलुन नेला पाउस…

भिजताना तो कृष्णसखा सोबत नसल्यावर
भासत असतो कृष्णासम राधेला पाउस…

उतरवले जातात जसे पिकलेले आंबे
मोरानेही तसाच उतरवलेला पाउस…

रायगडावर लाख विजांच्या फौजा आणत
दिसला मज मुजऱ्यासाठी झुकलेला पाउस…


४.
कळीचा श्वास गुदमरतो...जराशी पाकळी उघडा
कसे होणार...भुंग्यांचा पहारा भोवती तगडा

तुझ्या नजरेतुनी चुकली मनाची खिन्नता माझ्या..
तुझ्या अद्याप वाट्याचा मुका माझ्यात हंबरडा

पिढ्यांचे चेहरे लक्षात होते फक्त काचेच्या
इमानी आरश्याचा त्या कुणी उचलून घ्या तुकडा

मनोबल लागले वाढीस पण नंतर कळुन चुकले
ढगांच्या आत पाउस.. पावसाच्या आतही सरडा

तुझ्या सुस्पष्ट रेघोट्यात दडले बालपण माझे...
मनाचा पांढरा कागद, स्मृतींनी व्हायचा करडा

हवेने घेतला आजन्म पंखांचा  तुझ्या धसका
नको आणूस उडताना नभाचा चोरुनी तुकडा

असे रेषांवरी रेषा धडकवत  दैव बदलवले
जगाच्या आरतीला रोज टाळ्या द्यायचा हिजडा


५.
देव कुणावर कोपत नाही
त्याचे त्याला उरकत नाही

किती भरवले घास मुलाला
आई कधीच मोजत नाही

हौस तशी टाचणीस नसते
फुगा जगाला बघवत नाही

उतरतात माणसे मनातुन
मनात कोणी उतरत नाही

पाठी पोकळ हाका नुसत्या
हाक.. चेहरा वळवत नाही

तशीच असते किनाऱ्यावरी
लाट नेहमी परतत नाही

घारे समान तिची सावली....
'केवळ' घिरट्या घालत नाही 

- प्रथमेश तुगांवकर

No comments: