वंदना पाटील - वैराळकर : पाच गझला



१.
कुणाची पापणीपाशी थबकली आसवे काही
विचारी कोण मायेने तुला वेड्या हवे काही

कशी गंधाळूनी गेली सुगंधी रात्र पाऱ्यांची
तुला ना आठवे काही मला ना आठवे काही

कितीदा त्याच त्या वाटा जुन्या चोखाळुनी झाल्या
ऊठा आता चला शोधु पुन्हा रस्ते नवे काही

पुन्हा लागे पहा माझा गडे एकांत बोलाया
मनाच्या अंगणी आले स्मृतींचे हे थवे काही

खुळ्या आशेवरी जगते अजुनही झाड चाफ्याचे
उद्या येतील वस्तीला नव्याने पारवे काही

२.
कसे लागले हे ऋतू मोहराया
नसे हाय डोळ्यात पाणी झराया

अता सोसण्याची गडे हद्द झाली 
अता कुंपणे लागली शेत खाया

जरी चालता वाट ठेचाळलो मी
गडे थांबना हात हाती धराया

अशी ओळखीची तुझी साद आली
कसे लागले पाय मागे वळाया

करू पाश सारे कसे मोकळे मी
उगा जीव गुंत्यात लागे पडाया

कसे हाय सारेच सोडून गेले
अता राहिले कोण माझे म्हणाया

३.
माझ्यासाठी कुठले डोळे झरले नाही
ठेच लागता हात कुणीही धरले नाही

तुला भेटण्या मी सेतु बांधुन पाहिला
दगड बिचारे पाण्यावरती तरले नाही

चालत होतो रस्ते हरवून गेल्यावरही 
भोग तरी वाट्याचे माझ्या सरले नाही

अंधाराची शाल भोवती लपेटली मी
 माझ्यासाठी कधी चांदणे झरले नाही

अज्ञाताचा प्रवास आणि एकटीच मी
मी कोणाच्या आठवातही उरले नाही

४.
फुल वा काटे मिळाले कवळले वेड्यापरी
मी पुन्हा आयुष्य माझे उधळले वाऱ्यावरी

या व्यथांनी आश्रयाला सांगना जावे कुठे
ही मनाची ओसरी आता रिती झाल्यावरी

गुंतला होता दिव्याचा जीवही त्याच्या मधे
हे पतंगाला कळे कित्येकदा मेल्यावरी

हा तुझा मोठेपणा की हिणवणे होते गडे
सांत्वना आलीस तूही संकटे गेल्यावरी

चेहऱ्याला रंग मजला फासता आले कुठे
राहिलो होतो जसा आयुष्य हे सरल्यावरी

५.
आभाळ भारलेले माझ्या कवेत आहे
काहीच आकळेना कोण्या नशेत आहे

ना काळजी उद्याची निश्चिंत मी तसाही
वारा तुझी खुशाली घेऊन येत आहे

ओढाळ पावसा जा बरसून तू जरासा
माझे तहानलेले सारेच शेत आहे

दुःखा सवे कसा मी जगतो नको विचारू
कळ काळजात थोडी बाकी मजेत आहे

ठरवून आखला मी होता प्रवास माझा
मज कोणत्या दिशेला आयुष्य नेत आहे

No comments: