मसूद पटेल : पाच गझला



१.
कदाचित राम अन् रबला तुही नाकारले असते 
तुझेही आप्त जर दंग्यात मित्रा वारले असते

परतले ना कुणा साठी कधी जे पाय माघारी 
तुझ्या हाकेवरी एका सहज माघारले असते

जिवाला लाभली असतीच मुक्ती जन्म जन्माची 
शवाला माझिया बस तू जरा शृंगारले असते

मना पासून जर तू हाक बुडतांना दिली असती 
तुझे तारू तुफानाने कदाचित तारले असते

तुझ्या शस्त्रा पुढे ना हारले जे घातकी शत्रू 
तुझ्या तत्वा पुढे नक्कीच तेही हारले असते

उगा तत्वेच कवटाळीत जर मी बैसलो नसतो 
मलाही यार दुनियेने इथे सत्कारले असते

२.
दुःखही माझे जगाला केवढे सुख देत आहे 
मी रडाया लागता दुनियेस हासू येत आहे

नफरतिंची स्फोटके आहेत जेथे पेरलेली 
मार्गदर्शक कां अम्हाला त्याच मार्गी नेत आहे ?

पहुडले आहे कधीचे नेमके रस्त्यावरी जे 
कोण जाणे ते कुण्या बेवारश्याचे प्रेत आहे

संपलो आहे कधीचा मी जरी लेखी जगाच्या 
गझल माझी आजही पण सारखी चर्चेत आहे

एवढी झाली विषारी येथली निर्मळ हवा की 
शेवटाचा श्वास आता भाइचारा घेत आहे

पेरले जे तेच येथे उगवण्याची रीत असता 
द्वेष पेरुन यार तुजला प्रेम कां अभिप्रेत आहे ?


३.
शल्य हेच की जाता जाता जगी पुरेसा ठरलो नाही 
मित्रां मधेच वाटप झालो शत्रूं साठी उरलो नाही 

पदर तसे तर हजार होते आतुर मित्रा सांत्वनास पण 
मी अभिमानी अश्रू होतो परक्या पदरी झरलो नाही 

तुझ्या जीवनी ना परतीचे वचन पाळले सखे असे की 
समोर मृत्यू दिसून सुद्धा मी माघारी फिरलो नाही 

कळ्या फुलांचा सुगंध होउन दरवळतो मी अजून जगती 
सरून गेलो देहाने पण गुणधर्माने सरलो नाही 

दुनिये सोबत जरी हारलो सर्व लढाया पुर्णपणे मी 
एक लढा पण माणुसकीचा अजून पुरता हरलो नाही 


४.
नावा समोर माझ्या जर जात चिकटली नसती 
माझी गझल कुणाला अजिबात खटकली नसती

वाऱ्यास संयमी जर तू फूस लावली नसती 
राखे मधील ठिणगी परतून भडकली नसती

जर हा निसर्ग त्यांच्या ताब्यात राहिला असता 
बरसातही ठराविक शेतात बरसली नसती

इतिहास भिन्न थोडा नक्कीच राहिला असता 
नावे खरी कुणी जर त्यातून वगळली नसती

मंजिलवरी कदाचित आजन्म पोचलो नसतो 
जर वाट गौतमाची आम्हास गवसली नसती


५.
तू सोडतोस अपुली वृद्धाश्रमात आई 
अन् सांगतो अम्हाला पोसावयास गाई

कत्तल करावयाला देशातला सलोखा 
सरसावले नव्याने सारे जुने कसाई

शेतीप्रधान भारत करतोय आत्महत्या 
अन् इंडिया विकासाची मारतो बढाई

राहून दूर नसते अंतर कुणा मधे अन् 
कोणी जवळ असूनी असते मधात खाई

जगलो अवश्य असतो मी आणखी कदाचित 
जर देह त्यागण्याची नसती जिवास घाई

होताच भास मजला माझ्यातल्या पशूचा 
माझ्या सवेच केली मी जन्मभर लढाई


- मसूद पटेल 







No comments: