वेदना जेव्हा उरी गर्भार होते
कागदावर मग गझल साकार होते
गाठता आली यशाची उंच शिखरे
निंदकांचे त्यातही उपकार होते
ते तुरूंगाची हवा खातात हल्ली
मठ जरी त्यांचे कधी दरबार होते
फोडला टाहो कधी ना हुंदक्यांनी
दुःख ते शालीन अन् लाचार होते
काल कुस्करल्या कळ्या ज्या माणसांनी
पाहिले त्यांचेच मी सत्कार होते
श्वास ज्यांनी चोरले इवल्या जिवांचे
ऐकले त्यांचेच जयजयकार होते
लावली बाजी जिवाची सैनिकांनी
वाचले तेव्हा किती संसार होते
२.
वाटते या चांदराती,तू उशाशी रे बसावे
आर्जवे माझी कराया तू सुरीले गीत गावे
बासरी होवून मी ही रे तुझ्या ओठीच यावे
मोरपंखी स्पर्श ह्वावा, अंग माझे मोहरावे
सोडुनी लाजेस सखया लोचनी हरवून जावे
लोचनांच्या दर्पणी या, मी मला निरखून घ्यावे
केशसंभारास अलगद राजसा तू पांघरावे
मखमली श्वासात तुझिया मोगऱ्याने दरवळावे
रेशमाची रात माझी रेशमी क्षण ना सरावे
विसरुनी साऱ्या जगाला दो जिवांनी एक व्हावे
३.
निजावी रात्र अन् व्हावा कहर बाई
भिजावे चिंब स्वप्नांनी नगर बाई
सुगंधी अंगभर झाल्या जुई जाई
स्मृतींना केवढा आला बहर बाई
मिठीची ओढ कासावीस करते मज
सरेना दीर्घ सांजेचा प्रहर बाई
विखुरते ती बटा मुद्दाम गालावर
सतावे मज हवेची ही लहर बाई
छळाया लागले हे श्वास ओठांना
गरम स्पर्शात थरथरती अधर बाई
फुलाच्या भोवती तो घालतो पिंगा
रुपावर भाळला बहुदा भ्रमर बाई
असे शिव पार्वतीसम आमची जोडी
व्यथांचे प्राशतो मिळुनी जहर बाई
कधी शब्दातुनी तो व्यक्त ना झाला
मला मुक प्रेमभावांची कदर बाई
पहाटे गुंग मधुस्वप्नात मी असते
मधे किंचाळतो कर्कश गजर बाई
सखी अबला नव्हे, आहेस तू सबला
लढाया सज्ज् हो खोचत पदर बाई
- हेमलता पाटील
No comments:
Post a Comment