स्वाती शुक्ल : पाच गझला



१.
वाढते अंतर कितीसे ये जरा मोजून पाहू 
फार नाही चार महिने भेटणे टाळून पाहू

ना कुणाला मान्य येथे आपले नाते तरीही
 आपली बाजू जगाला एकदा सांगून पाहू

ऐनवेळी मागण्या डोळ्यातूनी माघार घेती 
त्याचवेळी ओठ ओठांना जरा भिडवून पाहू

गंध हा आहे तुझा जो बिलगला आहे मलाही
 वाटते खोटे तुला तर चल मिठी मारून पाहू

एवढ्या रामायणाचे मूळ कारण एक रेषा 
पण तुझ्यासाठी हवेतर उंबरा लांघून पाहु


२.
सरीसारखा तू उन्हासारखी मी 
तुला वाटते का तुझ्यासारखी मी?

कधी मोह माझा पडावा तुलाही 
तुलाही दिसावी तिच्यासारखी मी

तुला लागला काय ठसका अचानक 
मला लाव ओठी..मधासारखी मी!

तुझे रंगले ओठ,मी काय केले? 
फुकाचीच चर्चा...."विड्यासारख­ी मी!"

तुझी कोण मी हे लपवतोस तेंव्हा
असे वाटते की.. गुन्ह्यासारखी मी!

३.
सवयीचा रस्ता असला की पाऊल भटकत नाही 
डोळ्यात तुझ्या मी हल्ली त्यामुळेच हरवत नाही

शब्दांची लावू शर्यत मग ठरवू कोण बरोबर 
चुकले कोण कसे केंव्हा मौनाला समजत नाही

मी माझ्या स्त्री असण्याचे पाठांतर इतके केले 
आईही आता काही नेमाने शिकवत नाही

गोष्टीतच शेवट असतो राजाला मिळते राणी 
या खोट्या खोट्या गोष्टी मी आता वाचत नाही

पाऊस कधीही पडतो भिजलेले अंगण असते 
मी दुःख अताशा माझे वाऱ्यावर सुकवत नाही

मी लाख ठरवले तरीही मज उंबरठ्याचे बंधन 
अन् चंद्र असा निर्मोही धरतीवर उतरत नाही

झोपेशी नाते तोडा हा आठवणींचा फतवा आता 
निजलेल्या साऱ्या स्वप्नांची धडगत नाही


४.
किनारा रोखतो आहे जरी वेल्हाळ लाटांना 
सुनामी येत असते पण तुला जवळून बघताना

तुला भेटून येणारी हवा येते इथे जेव्हा 
कुणाला काय सांगू मी किती हा त्रास श्वासांना!

जराशी लावली लिपस्टिक,तिथे हा घोळ केला 
मी गुलाबी रंग चढला ना तुझ्या तांबूस ओठांना

निघूनी जायचे असते जरी एकांत शोधाया कुठे 
पर्याय असतो का कधी पाऊलवाटांना?

तुला भेटायची इच्छा मलाही होत असते पण 
उगाचच वाटते पुन्हा कुणी पाहील दोघांना!

जराशी शांतता होती तरी एकत्र होतो ना? 
किती आवाज केला तू मला सोडून जाताना!


५.
प्रेम केले एकमेकांवर उधारी सारखे 
वेगळे झालो पुन्हा मग कर्जमाफी सारखे

मान्य सध्या मी तुझी नाही कुणीही पण 
तरी बोल ना तू फक्त थोडे आज पुर्वी सारखे...

एकदाचे ठरव आणिक सांग बोलू की नको 
सारखे पकडू नको शब्दात कात्रीसारखे

राग आल्यावर मला समजून घे तू.. शांत हो 
सांग कितिदा वाक्य वापरशील ढाली सारखे?

जन्मदात्री अन तरीही वांझ बाई सारखे 
वागते आयुष्य हे सावत्र आई सारखे

- स्वाती शुक्ल

No comments: