जयदीप जोशी : पाच गझला



१.
येत नव्हता पाय आधी काढता
आडवी आली प्रवाहाधीनता..

काय दिसते काय आपण पाहतो
प्रश्नचिन्हच वाटतो ना कोयता

लावला आहेस कुठला रंग तू
रंग काळोखात दिसतो कोणता

होत आहे काय ते कळले तरी
काय झाले येत नाही सांगता

ठेवला आहेस तू संबंध पण
राहिला आहे कितीसा राबता

शेवटी होणार आहे का खरी
वर्तवत आहेस तू जी शक्यता

हातवारे केवढे करतोस तू
येत नाही का स्वतःशी बोलता


२.
तू तू आहेस का तुझे हे विचारणे सलते
तू तू नसतीस तर तुझ्यावर प्रेम किती असते

जादू आहे उन्हात की जमिनीची किमया ही
ह्या काचेच्या झाडाची सावली कशी पडते

जाता जाता गालांवरती देतो मी पापी
हात पकडते, झोपेतच ती "थांब घरी" म्हणते..

पाय निघाल्यानंतर माझे डोळे मिटतो मी
हाक ऎकता क्षणी तुझी घर कानांना दिसते

देणाऱ्याचे हात हजारो, ही दुबळी झोळी
घेतो ते बाहेरच पडते आत किती उरते

एक दगड फेकून बघू का डोहामध्ये ह्या
डोहामध्ये पडलेले प्रतिबिंब कसे हलते


३.
ती घरात हिंडते अजून काय पाहिजे
डार्क नेट टाळते अजून काय पाहिजे

मी तुला कुशीत घेत पाठ टेकताक्षणी
गाढ झोप लागते, अजून काय पाहिजे

जीव ओततो, अबोल झाड पाहते मला
पान पान हासते अजून काय पाहिजे

पाडली जुनी घरे, नवीन बंगले तरी
गाव गाव वाटते अजून काय पाहिजे

ओरडा मिळेल हे तिला कळत असूनही
ती खरेच बोलते अजून काय पाहिजे


४.
किती कौतूक होड्यांचे तुझ्या
विषय काढू तराफ्यांचे तुझ्या

मला झाडा कळत नाही कसे
किती उपयोग पानांचे तुझ्या

जरा हे बांधलेले हात बघ
करू मी काय वाद्यांचे तुझ्या

जगाला फार नाचवलेस तू
कळू दे शब्द गाण्यांचे तुझ्या

कसे कळणार.. अंधारात तू
दिवे विझलेत डोळ्यांचे तुझ्या

बघत बसतो घराची भिंत मी
ठसे दिसतात पायांचे तुझ्या

किती पटकन पुढे गेले दिवस
करत अपमान पुतळ्यांचे तुझ्या


५.
शब्द सोडून मोड अश्रूंचा?
दे मला चीट कोड अश्रूंचा

जीव भांड्यात पाड दारूचा
बर्फ ग्लासात सोड अश्रूंचा

गाव नेले तुझे त्सुनामीने
फोडला एक फोड अश्रूंचा

मी तुला वाटलो तसा नव्हतो
एक माणूस गोड अश्रूंचा

लुकलुकत राहिले तुझे डोळे
डोह काही करोड अश्रूंचा

कोण कंत्राटदार ? पाहूदे..
एक बनतोय रोड अश्रूंचा

- जयदीप जोशी

No comments: