अविनाश सांगोलेकर : पाच गझला



१.
फूल मजला एकही माहीत नाही !
प्राक्तनी काटे ,तरी मी भीत नाही !

मद्यप्यांनो,का असे दारात येता ?
दुःख झाले खूप,तरी मी पीत नाही!

थोडकीही का करावी मी अपेक्षा ?
कर्मयोग्याची अरे, ही रीत नाही !

दाद तुमची वाटते मज जीवघेणी ,
दुःख माझे गझल वा गीत नाही !

लोक हो,गझलेत झाल्या खूप टोळ्या ,
मात्र 'अविनाश'च कुण्या टोळीत नाही !


२.
हझल
का हो माझे असेच होई ती आल्यावर ?
पतंग माझा गोता खाई ती आल्यावर !

पंखा देतो थंडथंडसा वारा ,तरिही -
अंगाची का होते लाही ती आल्यावर !

डोली सारी सजून झाली , हाय ! परंतु -
पसार झाले सारे भोई ती आल्यावर !

बैल मारका तुम्ही समजता मला ,  लोकहो !
मी तर बनलो गरीब गाई ती आल्यावर !

'ती ' म्हणजे हो कोण , कोठली ? - नका विचारू ,
' अविनाश ' ची तर शुद्धच जाई ती आल्यावर !


३.
कुठे लोपली अस्सल चळवळ ?
ऐकू येते केवळ खळखळ !

घरीच बसले जुने जाणते ,
येथे झाली त्यांची अडगळ ?

वृद्ध कुणी जर तुम्हां भेटला ,
घ्या ना त्यांची उसनी कळकळ !

कार्य विधायक घ्या मग हाती ,
नका माजवू नुसती खळबळ !

हा  ' अविनाश 'च ऐका म्हणतो ,
येणाऱ्या काळाची सळसळ !


४.
माणूस मारणारे , ते लोक कोण होते ?
मूल्यास गाडणारे , ते लोक कोण होते ?

आपापसांत आम्हां , झुंजावयास लावुन ,
स्वार्थास साधणारे , ते लोक कोण होते ?

काहीच धाक नाही ,गुंडास राहिलेला ,
गुंडास पाळणारे , ते लोक कोण होते ?

' काही तरी करा हो ! , धोक्यात लोकशाही ! ',
- हा आव आणणारे , ते लोक कोण होते ?

' अविनाश ' !, तूच आता , शोधून काढ अंती ,
सत्यास जाळणारे , ते लोक कोण होते ?


५.
बोलायचे तर बोल ना !
आता स्वतःला सोल ना !

पाहू नकोस अशी मला ,
जाईल माझा तोल ना !

वाजू कसा दोन्हीकडे ,
मित्रा ! अरे , मी ढोल ना !

माझी गझल जर आवडे ,
बिनधास्त आता डोल ना !

' अविनाश ' गीता सांगतो ,
त्याचे कुणाला मोल ना !

- प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलेकर ,
बाणेर , पुणे - ४११०४५
संपर्कक्रमांक : ९८५०६१३६०२

No comments: