संजय गोरडे : चार गझला



१.
तिच्या दारी फुलांचा ताटवा असतो
तरीसुद्धा तिला गजरा हवा असतो   

जिथे बोलायचो, भेटायचो आम्ही
तिथे दररोज पक्ष्यांचा थवा असतो

तुम्ही नुसतेच उधळा चांदणे उधळा
तिच्या माझ्यात सध्या चांदवा असतो  

तिच्या प्रत्येक शब्दाची गजल होते
तिच्या ओठातला मिसरा नवा असतो   

किती माझ्या वहीला लागल्या मुंग्या
तिच्या शब्दात इतका गोडवा असतो

तिच्या पश्चात हे आयुष्य पाचोळा
तिचा सहवास म्हणजे गारवा असतो   


२.
देहाची लाही काही क्षण 
नक्कीच कढाई काही क्षण!

मी किती तुला विसरू म्हटले
करतात चढाई काही क्षण!

मी ऐकत आलो ना त्यांचे!
का ऐकत नाही काही क्षण?

लेकरू स्मृतीचे रडताना
गाती अंगाई काही क्षण

आहे तारण हा जन्म तुला
माझी भरपाई काही क्षण

या दुनियेच्या नजरा चुकवत
झाले उतराई काही क्षण

आजही कधी येता जाता
दरवळते जाई काही क्षण

तू विसर तुझ्या माझ्या मधले
मी विसरत नाही काही क्षण


३.
तुझ्यासाठी तुला टाळायचे आहे
मला माझे वचन पाळायाचे आहे

जिवाला आजवर जाळीत आलो मी
जिवाला आजही जाळायचे आहे

तसे आहे कुठे दोघांमधे अंतर?
तरीही फक्त सांभाळायचे आहे

कधी जर भेटला मुखचंद्र कोठेही
मनापासून ओवाळायचे आहे

तुला अव्यक्त डोळ्यांनी, तुझ्या नकळत
पुन्हा मनसोक्त न्याहाळायचे आहे

तुझ्या कविता, तुझी चित्रे, तुझी पत्रे
पुन्हा सारे जुने चाळायचे आहे

जगाची एकदा सोडून मर्यादा
तुझ्यावरती पुन्हा भाळायाचे आहे

मला जपलेस तूही काळजामध्ये
तुला शब्दांतुनी माळायचे आहे

४.
अताशा संपली शाळा मुलींनो...
स्वत:ला फार सांभाळा मुलींनो!

जगाला खूप आवडतोय हल्ली
करा तो चेहरा काळा मुलींनो

पुढे भाळायला आयुष्य आहे!
जराशी पुस्तके चाळा मुलींनो

नको इतक्यात स्वप्नांचा चुराडा,
नको इतक्यात वरमाळा मुलींनो!

मुलींची फार चिंता या जगाला
मुलींचा फार कंटाळा मुलींनो

किती उपकार तुमचे आसवांवर!
तरी ढाळायचे, ढाळा मुलींनो!!

पुन्हा ठरतेच कोणी निर्भया अन्
पुन्हा येतोच पडताळा मुलींनो!

घराचे काळजी करतात डोळे
उशीरा यायचे टाळा मुलींनो

संजय गोरडे, 'सौभद्र'
7276091011

No comments: