श्रीराम गिरी : चार गझला



१.
झिजवून लेखणीला उपयोग होत नाही;
डोळ्यास कोणत्याही ह्या जाग येत नाही .

आनंद सोहळ्यांचा वर्षाव रोज असुनी;
माणूस कोणताही येथे सुखात नाही.

नाकारली उगा ना  आमंत्रणे जगाची ;
मी रक्त पीत नाही,मी मांस खात नाही.

कसले वळण मनाचे,ही कोणती अवस्था;
कुठल्याच वेदनेची धडकी उरात नाही.

ना ताठ ठेवली ही नुसतीच मान येथे;
मी आदरातसुध्दा केली कपात नाही.

ठेवून पान कोरे गेली मुळात सटवी;
शंका कुणावरीही माझ्या मनात नाही.


२.
दगलबाजीचा नवा तपशील होणे;
लावते चटका तुझे सामील होणे.

हा युगाचा कोणता संकेत आहे;
माणसाचे एवढे फाजील होणे.

हे पुन्हा साम्राज्य आले वादळाचे;
राहिले सोपे कुठे कंदील होणे.

हीच आहे ईश्वराची भेट येथे;
विश्वशांतीशी तुझे बांधील होणे.

करत गेले पांगळे प्रतिभेस नंतर;
ह्या कवीत्वाचे असे छापील होणे.


३.
ठेवला लपवून सारा मामला;
घेतले समजून तू इतके मला.

हाक मारू देत हे आमिष किती;
ऐकतो आवाज माझ्या आतला.

ठोकला दावा न आयुष्यावरी;
मान मीही वेदनांचा राखला.

मी न काही बोललो  येथे जरी;
जीवना तू देत गेला दाखला.

चालणाऱ्यांची  कसोटी ही आता;
केवढा रस्ता धुळीने माखला.


४.  
सांग दुनियेला तुझा तो ठोकताळा;
मासळीचा ह्या कसा टिपलास डोळा.

बरसण्यासाठी घनाला वेळ देतो;
मागतो उसना कुठे मी पावसाळा.

मारले माथी किती ह्या पुस्तकांच्या;
ही खरे मार्केट झाली पाठशाळा.

ठेवुनी रस्ते खुले ह्या श्वापदांना;
पाळता कसला  कळेना दिवस काळा.

ऊन कळते डांबरी रस्त्यावरी हे;
भेटतो छायेत कोठे हा जिव्हाळा

- श्रीराम गिरी

No comments: