गौतम राऊत : दोन गझला



१.
नव्हताच दोष काही नुकसान काय देऊ
फुकटात मागतो तो मग दान काय देऊ..

आधीच देह माझा केला तुझ्या हवाली
देशा पुन्हा तुला रे बलिदान काय देऊ ?

येते कुणामुळे जर वांध्यात लोकशाही
त्या देशनिंदकांना सन्मान काय देऊ.

होतो जिवंत जेव्हा देता कधी न आले
मेल्यावरी..उशाला सामान काय देऊ..

अवघा विकास झाला तो मारतोय थापा
चर्चाच होत नसता..आव्हान काय देऊ..

२.

असतो किती भरवसा देहास अोसरीचा
होतो फितूर जेव्हा..वनवास आखरीचा

बघ चालतात चर्चा निष्काम उंदरावर
दिसला कुणास नाही उपवास मांजरीचा

पोरासमोर काही नसतेच खायचे पण
मुद्दाम एक घेतो मी घास भाकरीचा

थकले शरीर आता डोळे जरी निकामी
का बाप राखणीला शेतास सत्तरीचा

अवघीच जिंदगानी त्या गोधडीत गेली
मग का हवाहवासा सहवास चादरीचा

No comments: