अझिझ खान पठाण : तीन गझला


१.  
नाव दुस-याचे सहज तू घेतल्यावर
केवढा आघात होतो काळजावर

चल उन्हाचे पदर घेऊ पांघरूणी
सावलीच्या या झळांनी पोळल्यावर

भांडणे झाली फुलांची मोग-याशी
मोगरा केसात मग तू माळल्यावर

आपले फुटणार आता बिंग बहुदा
आरशाने पाहिले तू लाजल्यावर

पावसा बघ फास मी घेणार नाही
तू सरींचे दोर खाली सोडल्यावर

शेत हतबल मज म्हणाले आर्जवाने
कासरे लपवून ठेवा पेरल्यावर

भारताचा स्वर्ग होणे शक्य आहे
जात नाही ठेवली जर  दाखल्यावर

एकता मज भेटली नांदत सुखाने
बार मध्ये फेरफटका मारल्यावर


२.
कुठे मज जायचे होते कुठे मी पोचलो आहे
कळेना या प्रवासाला कसा मी लागलो आहे

मलाही वेड उंची चे खरच नाही, असे नाही
परंतू नाळ मातीशी जुळोनी चाललो आहे

स्वतःच्या भोवती बहुदा फिरत मी राहिलो असतो
निघालो शोधण्या रस्ता जरी ठेचाळलो आहे

अपूर्या चार इच्छांचे उरी घेऊन गाठोडे
कधी मी थांबलो नाही जरा मंदावलो आहे

तुझा उल्लेख झाला की मनाच्या घालमेलीला
कुठे बोलायचे नाही असे मी बोललो आहे

सुचेना की  कसे मी पांग प्रेमाचे तुझ्या फेडू
तुला सोडून जाताना किती ओशाळलो आहे,..

असा पायात घुटमळतो दगड तो एक मैलाचा
तुझ्यासाठीच येथे मी म्हणाला थांबलो आहे.


३.
तुझ्या नि माझ्या मनात होते बरेच काही
जशी मजकुरा शिवाय पत्रे असेच काही

जगासवे तर लबाड वाणी खपून जाते
वदून पाहू जरा स्वतःशी खरेच काही

नकोच ते कोरडे धबधबे तुझ्या मनाचे
पुरे मला पापण्यातले या  झरेच काही

ऋणानुबंधा मधेच होता  निरोप दडला
विभक्त हो पण जगास दे कारणेच काही

इमारती या गिळून फुगल्या जुनाट गांवे
अता जुनी माणसे दिसे ना घरेच काही

- अझिझखान पठाण.
गाळा क्र.TYPE-5/12/01,
विद्युत विहार,के टी पी एस वसाहत,
कोराडी,जील्हा-नागपूर.
 7875894343

No comments: