मंगेश गजभिये : दोन गझला




सोडून दूर माझे गेले मला जिव्हाळे
जे सोबतीस उरले त्यांच्या मनात काळे

पाऊस कल्पनांचा आला निघून गेला
ह्रदयात ठेवले मी आजन्म पावसाळे

त्यांच्या कलंदरीचे गुणगान होत आहे
जे वागले जगाच्या थोडे जरी निराळे

धनधान्य साठवाया जागा कुणा पुरेना
चतकोर भाकरीला असती कुणी नवाळे

गेली जळून गेली वस्तीच यातनांची
गावात सज्जनांना फुटती अता उमाळे

२.
सोसणाऱ्या माणसांचा सोयरा मी
वेदना माझी खरी, आहे खरा मी

चूक झाली बांधले मी घर स्वतःचे
वाटलो नाही कुणाला मग बरा मी

दुःख जेव्हा कैद करतो मी खुबीने
वाटतो तेव्हा जगाला हासरा मी 

बोलणारा सरळ मी माणूस आहे
भामट्यांना देत नाही आसरा मी

गाय मेली अन् कसाई शांत झाला
ठेवतो बांधून आता वासरा मी...

प्राणपक्षी आसमंती हा उडाला...
बांधला जेव्हा गळ्याला कासरा मी.....

- मंगेश वा. गजभिये
सादिक नगर, बार्शीटाकळी
जि.अकोला

No comments: