सुशांत खुरसाळे : तीन गझला




१.
बाकी कसे आहे..कसे असणार आहे यापुढे
इतके पुढे जाऊनही माघार आहे यापुढे

इतकी तलम, झाली जखम..की मन विचारत राहिले-
"उपचार आहे हाच की उपचार आहे यापुढे ?"

सगळ्याच गोष्टींची कशाला आठवण काढायची
सगळ्याच गोष्टींचा विसर पडणार आहे यापुढे

मी आजवर होतो कुठे, हे यापुढेही शोध तू
मी आजवर होतो तिथे असणार आहे यापुढे

ते काय आहे जे कधी झालेच नाही आजवर
वा ते असावे काय जे होणार आहे यापुढे

प्रत्येकवेळी हेच जाणवते नि सारे संपते
ज्याची सवय लागेल ते नसणार आहे यापुढे

२.

एका क्षणी सगळे खरे होते
एका मुलीचे घर इथे होते

कुठलीच शंका राहिली नाही
इतके कसे वाटत बरे होते

माझे स्वतःचे काय झाले हे
झालेय का..जे व्हायचे होते

ताटातुटीचा क्षण कसा येतो
अन काय तो आल्यामुळे होते

जे आपल्या दोघांमधे आहे
ते आजवर कोणामधे होते

जे वाटते, ते होत का नाही
का नेहमी वाट्टेल ते होते

३.

ही उदासी पार ओलांडत मला
चालली आहे सतत व्यापत मला

मी मला कंटाळवाणा वाटतो
सांग तू माझ्यातली गंम्मत मला

मी मला कंटाळवाणा वाटतो
पण तरी बसतोच मी ऐकत मला

मी मला कंटाळवाणा वाटतो
त्यात तुमची लागली संगत मला

मी कसा आलोय वाहावत इथे
जायचे होते कुठे वाहत मला

No comments: