इंद्रजित उगले : दोन गझला



१.
जसाही माज गर्दीला पुढे चढला
दगड कोणीतरी मग एक भिरकवला

किती नकळत पुन्हा अंधार हा पडला
किती नकळत पुन्हा हाही दिवस सरला

तुझ्या डोळ्यांमधे अस्वस्थता कसली
कशाने एवढा आहेस गोंधळला ?

किती साधे सरळ सगळे सुरू होते..
अचानक केवढा हा काळ ओढवला !

न जाणे काय झाले.. वाहवत गेलो...
विषय काढायचा नव्हता मला.. निघला !

मला तर झोप काही आवरेनाशी...
कुणाचा ह्या क्षणाला फोन कडमडला ?

अचानक काय आठवले तुला इतके
अचानक एवढा तू खिन्न का हसला


२.
इतकी भोळी ; इतकी साधी
कुठली द्यावी तिला उपाधी?

कुठला विषय कुठे नेतो तू
माझे ऐकुन तर घे आधी

काढ स्वत:ला देहामधुनी
लागुन जाइल तुला समाधी

सांज ढळावी अशी अवस्था
ही रुखरुख आहे की व्याधी

माझ्यानंतर कोणी नाही..
..कोणी नव्हते माझ्या आधी !

- इंद्रजित उगले

No comments: