सुधीर बल्लेवार : पाच गझला










१.
गुन्हा केलाच आहे तर सजा स्वीकारणे आले
उन्हाशी वैर झाल्यावर, झळा ही सोसणे आले

गडे जिंकूनही तू, ही लढाई जिंकली नाही
मला हरवून वाट्याला तुझ्याही हारणे आले

कसा जाऊ मनाला सांग मी घेऊन माघारी
तुझ्या आधीन झाल्यावर तुझे नाकारणे आले

लगोलग बांधले साऱ्या स्मृतींचे एक गाठोडे
तुझे परतून आल्याने, नव्याने बहरणेे आले

नशिबाने मिळाली ही मला फितरत मलंगाना
नशिबानेच पायांना निरंतर चालणे आले

२.

फुलांवर भाळलो काट्यासही गोंजारले होते
मला जेंव्हा वसंताने तुझ्या कवटाळले होते

किती होती तुला घाई घरी परतून जाण्याची
अताशा तर कळीचे फूल होणे चालले होते

व्यथेचे शब्द होते की कुणाचे नाव होते ते
तुझ्या ओठांवरी जे त्या क्षणी रेंगाळले होते

मला समजून घेताना जरा केलीस घाई तू
मला आत्ता कुठे माझे सुगावे लागले होते

चिता शमलीच नाही, का निरंतर पेटते आहे?
कुणी जावून सुर्याचे कलेवर जाळले होते!

३.
कोणत्या विश्वात हल्ली राहतो
शेर सुचल्यासारखा का वागतो

काळजाचे मी दिले आंदण तुला
आणखी हुंडा कशाला मागतो

तू असावी आजही हृदयामधे
एक ठोका सारखा झंकारतो

चंद्र ताऱ्यांची नको आशा करू
ये तुझ्या मी भोवती आभाळतो

सज्ज केला गाल मी, ओघळ अता
पापणी आडून का डोकावतो

राबते दिनरात ढोरासारखी
कोण इच्छेला पराणी टोचतो

४.

मनाच्या भोवताली आठवांचे गांव होताना
उभी गंधाळते काया तुझा शिरकाव होताना

तुझ्या रेशीम स्पर्शाने, दवाचे चांदणे होते
निशेचा रंग विरघळतो उन्हाचे घाव होताना

व्यथेची शंभरी झाली, जगाच्या खेळपट्टीवर
सुखाला आजही बघतो इथे निर्धाव होताना

कशी विसरून जाती पाखरे आपापली घरटी
जरासे पंख फुटल्यावर, जरासे नाव होताना

अखेरी जिंकलो मीही, मला मृत्यू बिलगल्यावर
तुझ्यामाझ्यात आयुष्या, रडीचा डाव होता ना?

५.

किती जाते मला अवघड
मनाची घालणे सांगड

लपवितो नेमका मुद्दा
जरी तो बोलतो भडभड

अताही का श्रवणबाळा
घरी येते रिती कावड?

फुलांच्या मागणीसाठी
ऋतुंची केवढी तडफड

सती गेली किती स्वप्ने
चितेवर राहिली राखड

कपाळी टांगले कुंकू
जिवाला वाटते बोजड

कुणी बसले मनाकाठी
स्मृतींची थांबली पडझड

- सुधीर बल्लेवार
नागपूर

No comments: