जयश्री वाघ : एक गझल



१.   
कोण सलते, कोण फुलते अन धुमसते सारखे
आतल्या माझ्यात दुसरे कोण वसते सारखे

उद्धटाला नम्रतेने जिंकुनी दावेन मी
भाबड्या या धारणेला कोण हसते सारखे

क्षुद्र, हिणकस वलगनांचा गाव आले सोडूनी
स्थिर,सोज्वळ शांततेला कोण डसते सारखे

आणल्या वळवून गायी बांधल्या गोठ्यात पण
एक हट्टी वासरासम कोण रुसते सारखे

एरवी पचवून घेते विषही रुद्रापरी
कासऱ्याला साप म्हणुनी कोण फसते सारखे

नाडती निर्बंध तरिही ओढ घेते अंबरी
वेग त्या पंखातला पण कोण कसते सारखे

लिंपले भगदाड, चमके वर मुलामा बेगडी
आतल्या हे आत तरीही कोण धसते सारखे

 - जयश्री वाघ


                     

No comments: