कलीम खान : पाच गझला



१.
घेऊन  जरी  निजतो , खोट्यांस  उश्याला  मी
केले न कधी लज्जित , कुठल्याच ख-याला मी

" व्याकूळ  तहानेने , माझे  अवघे  पाणी "
ही हाक समुद्राची , सांगीन  झ-याला मी

हातात अगर माझ्या , नाहीच जगवणे तर
हे झाड विनाकारण , लावूच कश्याला  मी

वैकुंठ  सदेह  कुणी , जाईल  कसे , बाबा
भुलथाप असे रे,ही , सांगीन तुक्याला मी

हातून गुन्हा घडला , चिंता  न  परंतू मज
निवडून सखे येता , पचवीन गुन्ह्याला मी

मागेच  थकून  तिथे , राहून  पिलू  गेले
घेऊन जरा ये तू , अडवीन थव्याला मी

" मज याद तुम्ही येता ", तेथून बुढी सांगे
देऊच निरोप कसा , चिंतीत बुढ्याला मी

तू वाट जगाला  पण , दे तेल  मला माझे
वांग्यास नको तर ते , देईन वड्याला मी

तू आज उपाशी तर , मदतीस विचार जरा
मिळणार तुला उत्तर , " येईन ऊद्याला मी "

" येशील पुन्हा जेंव्हा , घेऊन चहा जाशिल "
ऐकून  सखे  आलो , हे  काल पुण्याला मी 

नादास  अम्हा  लावुन , हसतोय  कसा  मेला
शाब्दांत गवसला तर , बदडीन 'झुक्या'ला मी

२.

गावा-गावांतुन इथल्या , जाऊन घरोघर आधी
ये आज करुया आपण , समतेचा जागर आधी

आहेस  कवी  तू  मोठा , मजलाही   माहित  आहे
पण कविता-बिविता नंतर,तू दे मज भाकर आधी

चरकातच ऊस अजूनी , पण ज्याला त्याला वाटे
आली तर यावी त्याच्या , वाट्याला साखर आधी

झालेच युदध जर तिसरे , ते होइल पाण्यासाठी
धरती , आकाश  असू दे , ये  वाटू  सागर आधी

हे शेतक-या आपणही , पेरूच आपुली शेती
पण येऊ दे आकाशी , गर्भार पयोधर आधी
(पयोधर = ढग)

जो येतो  तुज  हाकलतो , दावणीस  बांधुन घेतो
घे शिकून भोळ्या सांबा , डोक्याचा वापर आधी

मातीत  राबुनी  झाले , आयुष्य  तुझेही   माती
तू काढ तुझ्या डोक्यातुन , बापाचे वावर आधी

विश्वास मलाही आहे , आम्हास मिळेलच पाणी
पण राहू दे  तर यारा , दगडास  गरोदर  आधी

ह्या छळती मजला सा-या , मी कुणा-कुणाचे ऐकू
प्रत्येक गझल मज म्हणते , तू व्यक्त मला कर आधी

३.

ती न याला हवी , ती न त्याला हवी
दुर्बलाची   अहिंसा   कुणाला   हवी

फक्त उध्वस्ततेची  मुकी सम्मती
आज चेकाळल्या वादळाला हवी

धर्म हा कोणता , माणसे मारुनी
इश्वराची कृपा , माणसाला हवी

शेत रक्षावया , जी असे राखुनी
ती सुरक्षा अता, कुंपणाला हवी

जर जगाच्या भल्यास्तव तुझे राबणे
तर तुझी काळजी , या  जगाला हवी

देशभक्तीस माझ्या,मला सांग तू
भेकडांची प्रशस्ती कशाला  हवी

माणसा सारखा , वागतो आज हा
लाज थोडी तरी , पावसाला  हवी

जे खरे तेवढे , स्पष्ट  बोलायची
एवढीशी मुभा , आरशाला हवी

ना कुण्या एकट्याचेच  आकाश हे
शाश्वती ही चिमण-पाखराला हवी

नापिकीचा नशीबी जुना खेळ हा
अन् नवी खेळणी, लेकराला हवी

मी रडायास तय्यार आहेच पण
सांत्वनाची हमी काळजाला हवी

४.

आकाशवेणा वादळी , जेंव्हा कधी ते सोसती
माझे सराइत शब्दही , कित्येकदा घायाळती

जिंकूनिया समरांगणी , येतात  जेंव्हा  वेदना
मज प्रश्न पडतो कैकदा , कैसी करावी आरती

मम अस्मितेचे शेवटी ,नव सरण जेंव्हा पेटले
तेंव्हा चितेवर आतली , संवेदना   गेली  सती

आले जरा भेटावया , मज दुःख जेंव्हा,नेमके
गेले कुठे सारेच ते , माझ्या सुखाचे सोबती

मी नेहमी ज्यांच्यापुनी , राखून  अंतर   राहिलो
आली कशी ती ना कळे,नकली पिलावळ भोवती

ज्यांच्या पिढ्या अजुनी इथे,मातीत आहे झोपल्या
त्यांना " न तुमचा देश हा " , हे सांगणे झाले अती

मग रात्रभर ज्यांच्यासवे , खेळून थकतो चंद्रमा
किरणे रवीची पांघरुन , त्या तारकाही झोपती

आश्वासने सुख-शांतिची , देऊन दे दुःखेच जो
मजला कळे ना त्याच का , देवास ते आराधती

चौकात जेंव्हापासुनी , यांचा दरोगा ठाकला
तेंव्हापुनी ही वाहने , फुटपाथवरही  धावती

जर सांगता तुम्ही अता , आम्ही न त्या पंथातले
तुमचे सकल चेलेच मग , दिंडीत का त्या नाचती

मृत्यू-सखा वेशीवरी , आलाच असला पाहिजे
तेंव्हाच माझी सोवळी , दुःखे   मला   शृंगारती

५.

घननीळ तुझ्या मेघातुन , धारा बरसाव्या सखये
अन् सूर्याच्या पारंब्या,जमिनीत रुजाव्या सखये

ज्या रुसून गेल्या  होत्या , वाळूच्या  व्यवहाराने
परतून किनार-यावरती,त्या लाटा याव्या सखये

श्वासांच्या  संध्याकाळी , लालसा  अजुनी  आहे
गात्रांतिल मुग्ध उषेच्या,मी कविता गाव्या सखये

बाजार नेत्र-चोरांचा , गल्लीत  येथल्या  भरतो
पापण्या जपूनच तू ही , येथे उघडाव्या सखये

बोटावर चेटकिणीच्या , ही दुनिया  वसली आहे
देऊच नको भलत्याला, हृदयाच्या चाव्या सखये

वृक्षाला माझ्या अवघ्या, हळुवार लपेटून घ्याया
तू नसांनसांतुन तुझिया , वेली उगवाव्या सखये

ही  किमया  सौंदर्याची , वा   दृष्टी  चळली  माझी
का ढगाआडल्या मजला,चांदण्या दिसाव्या सखये

घर-दार प्रकाशित करुनी , तू  रात्र  पराजित केली
पण झगमगत्या ह्या पणत्या,वेळीच विझाव्या सखये

तू  एकच  केवळ  माझ्या , प्राणात  घनीभुत  व्हावी
मग माझ्या इच्छा सा-या, वा-यात विराव्या सखये

No comments: