आठवणीतले कविवर्यः सुरेश भट ऊर्फ दादा: डॉ. किशोर सानप



                                    रेखाचित्र : अरुण चिंचकर

    माझा जन्म अकोल्याचा. सन् 1979 मध्ये अमरावतीला आमच्या काकांकडे राहायला आलो. शिवाजी शिक्षण महाविद्यालय, अमरावती येथील बी. एड. महाविद्यालयात नुकताच प्रवेश घेतला होता. साहित्य क्षेत्रांतील आम्ही उमेदीचे कवी-लेखक नगर वाचनालयाच्या परिसरात दररोज सायंकाळी लेखक-कट्टा भरवत होतो. अमरावती येथे साहित्य चळवळ जोरात होती. सिद्धार्थ साहित्य संघ, साहित्य संगम, विदर्भ साहित्य संघाची शाखा, हिंदी-मराठीत लिहिणारे पत्रकार, साहित्यिक अशा विशाल दृष्टिकोणातून आम्ही तरुण धडपडे मित्र तेव्हा वाङ्मयीन चळवळीत सकि‘य होतो. शिवा इंगोले, सुखदेव ढाणके, देवानंद गोरडे,  विष्णू सोळंके, अशोक काळे, किशोर बोबडे, बबन सराडकर, दादा इंगळे, गंगाधर पुसदकर, अरुण सांगोळे, कविता डवरे, अशोक थोरात, राजेश मह‘े, राजीव शिंदे, साहेबराव थोरात, रमेशचंद्र कांबळे, जैमिनी कडू, जनक कडू, सुरेश आकोटकर, भीमराव वैद्य, मनोहर परिमल, असे कितीतरी मित्र आणि जेष्ठांसह आमचे दिवस साहित्य सृजन आणि भाषा, संस्कृती, सामाजिक चळवळी, मेळावे, शिबिरे आदींच्या अवकाशात कसे निघून गेले कळलेच नाही. अमरावतीच्या परिसरात आणि बाहेरही खेड्यापाड्यांत आम्ही मित्र आमच्याच वर्गणी-खर्चाने कविसंमेलने, साहित्यिक कार्यक‘मांना जायचो. वसंत आबाजी डहाके, प्रभाताई गणोरकर, शरदच्चंद्र सिन्हा, उषाताई चौधरी-प्रकाशदादा चौधरी यांचं घर तर आमच्यासाठी कविकट्टाच होते. बाहेरही प्रभाताई कविसंमेलने आयोजित करून त्यांच्याच गाडीत आम्हाला न्यायच्या. खरंतर अमरावतीची दोन तीन वर्षे माझ्या वाङ्मयीन जडणघडणीतला सुवर्ण-काळ होता. आजही ते दिवस आणि आठवणी जशाच्या तशा मनाच्या तळाशी जपून ठेवल्या आहेत. अधून मधून आठवणींचा झरा आतल्या प्रतिभेच्या उगमाशी प्रपातासारखा धडका मारतो...
    आम्हा साहित्यिकांची मांदियाळी जपणारा जीवाभावाचा आमचा मित्र नरेशचंद्र काठोळे. सर्वांच्याच हृदयस्थानांना घट्ट बांधून ठेवणारा मैत्र. प्रत्येकाशी घरोबा आणि जिव्हाळा. काळजी वाहकही. अडीनडीला धावून येणारा सखा सोबती. नगर वाचनालयाचे सभागृह आणि बाळासाहेब अनगळांचे निवासस्थान म्हणजे अमरावतीचे वाङ्मयीन आणि सांस्कृतिक संवर्धनाचे आश्रयस्थान. कविवर्य शरदच्चंद्र सिन्हा नित्य नेमाने यायचे आणि वर्‍हाडी कविता आणि गप्पागोष्टींनी अक्षरशः गदगदित करायचे. मिरुगाच्या बरसातीऽऽऽ मिरुगाच्या बरसातीऽऽऽ बरसती वले मोतीऽऽऽ ही काव्यधून आजही आमच्या कानात निनादते.
    कविवर्य सुरेश भटांची ऊर्फ दादांची तर नित्यनेमाने बाळासाहेबांकडेच मैफल जमायची. दादा म्हणजे आमचे प्रेरणास्थान आणि स्फुर्तिदैवत. रात्री आठच्या सुमारास दादा आम्हा वीस पंचवीस लेखक-कवींना घेऊन बसायचे. खाजगी वास्तपुस्त ते वाङ्मीयन घडामोडी ते राज्य ते देशाच्या राजकारणावर दादा मनमुक्त बोलायचे. दादा एकदा तनमनधन लावून गप्पांत रंगले की कुणालाही घरी जाण्यास मज्जाव. अस्खलित वर्‍हाडी शैलीमध्ये दादांच्या तोफांचा मारा सहन करण्याची कुणातही हिंमत नसायची.        
    खाणपाण सतत सुरू. तासाच्या अंतरानं चहा. राजकमलच्या गड्डा हॉटेलातून दादाभक्त विनायकराव तायडे निरोप मिळताच, प्रत्येकासाठी दोन-तीन प्लेट आलुबोंडे, चहा वगैरे विनामूल्य पाठवायचे. शंभरेक आलुुबोंडे तरी असायचे. दादांचं शरीर जितकं पहाडी तितकंच दादाचं खाणंही अजबच. दहा पंधरा पंचवीस अशी शर्यत लागायची. दादांनी कधीच कुणाला जिंकू दिलं नाही. आम्ही बुजरे. दादांना खाण्यात हरवण्याची आमचीही दानत नव्हती. थर्मासभर चहा आणि आलुबोंडा म्हणजे दादांचा विकपॉईंट. कथाकार के. ज. पुरोहितांनाही आलुबोंडा खूप आवडायचा. अशा अनेक जेष्ठ श्रेष्ट दिग्गज नामवंत दादा आणि दादांवर भरभरून प्रेम करणारे कवी-लेखक-समीक्षक दादांच्या सहवासात असायचे. आम्हाशीही त्यांचा दादा इतकाच जिव्हाळ्याचा संबंध यायचा.
    दादा जसे पहाडी व्यक्तिमत्त्व होते, तसेच ते मनाने आणि जिव्हाळ्यानेही पहाडी होते. आमची तेव्हा चहा प्यायचीही सोय नसायची. आजचे दहा हजार रूपये तेव्हाचे हजार रूपयापेक्षाही भारी होते. दादांचा कसाबसा अर्थसंसार चालत होता. तरी हजार रूपये दादा एका बैठकीवर उधळायचे. दादा अत्यंत बुद्धिमानी आणि स्वाभिमानी आणि विचारंवतही. सर्व पक्षाचे मंत्री, मु‘यमंत्री दादांचे मित्र असायचे. बाळासाहेब ठाकरे ते लता मंगेशकर ते हृदयनाथ ते आशाताई भोसले ते सर्वच कलावंत-प्रतिभावंत यांच्याशीही दादांची मैत्री होती.
    मला अजूनही दादांचं मिरॅकल जगणं-वागणं-बोलणं आठवतं. मंत्रालयात दादा बाथरूमला जायचे आणि निघताना मंत्र्याच्या हातावर दहा रूपयाची नोट ठेवायचे. मंत्री भिवया उंचावून दादाकडे बघायचे. तेव्हा दादा उत्तरायचे, मी कुणाचं बाथरूम सुद्धा फुकट वापरत नाही. फुकट वापरायला आपल्या राज्यात आणि देशात तुमच्या सारखे खूप मंत्री-संत्री आहेत...आता यावर मंत्री महोदय काय बोलणार? दहा रूपयाच्या नोटेकडे आणि दादांच्या पाठमोर्‍या छबीकडे थक्क होऊन पाहण्याशिवाय त्यांच्याही हाती काही उरायचे नाही.
    दादा म्हणजे मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीत विराजमान असलेले मराठी गझलेचे जणू हिमशिखर. हिमनगासारखी दादांची प्रतिभा. पृष्ठभागावर एक अष्टमांश तर उरलेली हिमनगाच्या खाली दडलेल्या शुद्ध, नितळ निर्झरातून डोकावणारी. आमच्या उमेदीतल्या नवोदितांच्या कवितांचे दोन तीन तासाचे पर्व दादांच्या पारदर्शक दृष्टिकोणातून प्रदीर्घ चिकित्सा संपली की मग दादांच्या गझल गायनाचे अखंड  गायनसत्र रात्रभर परिसरात निनादायचे. शब्द-स्वर-संगीत-सूर-ताल-लय-चाल ह्या सर्वांनी दादांची गझल अंगावर शहारे उठवायची. मनात चैतन्य जागवायची. नव्याने समाजासाठी लिहिण्याची प्रेरणा द्यायची. दादा त‘ीन झाले आणि गझल गायनात रमले की मग आमचीही तंद्री सकाळपर्यंत भंगायची नाही. दादा गात असताना त्यांचे लक्ष आमच्या हावभावांकडे असायचे. टाचणीचाही आवाज त्यांना जमायचा नाही. टाचणी स्वतःहून पडलीच आवाजासाठी तर तीही दादांच्या स्वरात आवाजाचा धर्म विसरायची. दादा म्हणजे एक अफलातून गझल सम‘ाट. जगावेगळे कवी. प्रतिभेचाच जीवन-प्रहर लाभलेले उंचीचे व्यक्तिमत्त्व. सर्वच बाबतीत.
    दादा नागपूर गेले आणि खूप काही काही साहित्य आणि सांस्कृतिक उपक‘मासोबतच पत्रकार, संपादक म्हणूनही त्यांनी सा. बहुमत निष्ठेने चालवले. गझल लेखनाला प्रोत्साहन देऊन नवनवे गझल कवी घडवले. दादा म्हणजे गझलचे चालते बोलते सर्वश्रुत आणि सर्व नवोदितांचे गुरूकुल होते. आज दादांचे शिष्योत्तम मोठे गझल गायक आणि गझल कवी म्हणून प्र‘यात आहेत. गझल नवाज भीमराव पांचाळे आणि गझल नवाज सुधाकर कदम हे दोन गझलेचे गायन-पीठ म्हणून आजही लोकप्रिय आहेत.
    दादांचं अमरावतीवर निरतीशय प्रेम. नागपूरला दादा रमले नाहीत. ते अमरावतीतच आमच्या सोबत नव्या नव्या गझलांच्या रियाजमध्ये रमायचे. आमचे हावभाव आणि चेहरा वाचून, दादा आपल्या गझलांची कठोर तपासणी आणि उलट तपासणी करायचे. गझल लिहिली की तिच्या प्रेमात दादा कधीच अडकून पडायचे नाहीत. दादांनी हजारो गझला तात्काळ फाडून कचर्‍यात फेकल्या. स्वतःच्याही आणि इतरांच्याही. कुणाची कविता नाहीच आवडली तर त्याच्या कवितेची बलस्थाने सांगत सांगत, दादा कवितेला केराची टोपली दाखवायचे. कवींना आणि लेखकांना न दुखवताही त्यांना ठोकपीट करून घडवण्याची दादांची शैलीही अफलातून होती.
    दादा म्हणजे एक स्वयंभू असे गझल आणि मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीचे ऊर्जास्त्रोत. कवीच्या जगण्याची स्वयंभू आणि स्वयंनिर्मित भारदस्त पहाडी शैली. दादांव्या व्यक्तिमत्त्वाचे असे अनेक कंगोरे आहेत. संपूर्ण दादा कधीच कुणाला सापडले नाहीत. दादा, आतल्या आत जगत होते. समाजातलं दुःख आणि वेदना मांडत होते. समाजाच्या दुःखमुक्तीसाठी काव्याचे शब्दास्त्र वापरत होते.
    दादांनी आपली सबंध हयात साहित्य-समाज-संस्कृतीच्या संवर्धनासाठी घालवली. गझलला मराठीत लोकप्रिय काव्यप्रकार म्हणून मान्यता मिळवून दिली. गझल मराठीत प्रतिष्ठित करण्याचे आणि मराठी गझल चित्रपट ध्वनीफितीतूनही देशात लोकप्रिय करण्याचे अद्वितीय वाङ्मयीन, सांस्कृतिक, भाषिक समृद्धीचे कार्य दादांनी केले. गझल चळवळीचे प्रवर्तक गझलकार म्हणूनही त्यांना मानासन्मानाने पुढे भूषविण्यात आले. दादा प्रतिष्ठा, सन्मानाकडे कधीच झुकले नाहीत. सन्मान-पुरस्कार-संमेलने दादांकडे झुकली. सन्मानीतही झालीत. दादा म्हणजे सन्मानाचा सन्माननीय महामेरू. दादा जितके सरळ तितकेच सणकी, फटकळही. कधीच कुणाला डोक्यावर घेणार नाही. डोक्यावर चढू पाहणार्‍या सांस्कृतिक मिरासदारांना त्यांनी कधी भीकही घातली नाही.
    दादांनी सन् 1961 ते 2001 पर्यंत रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार, झंझावात, सप्तरंग अशा पाच गझल संग‘हांचे सृजन केले. शिरीष पैंनी सुरेश भटांची निवडक कविता हे दर्जेदार संपादनही केले. दादा आणि त्यांची गझल म्हणजे; एल्गार-झझांवात-सप्तरंगी परंतु रंग माझा वेगळाच! निराळ्या धाटणीचा आयश आणि शैलीचा सामाजिक झंझावाती एल्गार! प्रेमातही आणि सामाजिक दुःखाविरूद्धच्या एल्गारातही दादांचा रंग वेगळाच! चल उठ रे मुकुंदा, केव्हा तरी पहाटे मला जाग आली, मलमली तारुण्य माझे, सुन्या सुन्या मैफलीत माझ्या तसेच उषःकाल होता होता काळरात्र झाली...ह्या चित्रपट गीतांचे स्वर अजूनही महाराष्ट्राच्या चैतन्यभूमीला स्नेह, प्रेम, संघर्षाची प्रेरणा देतात. लताताई, हृदयनाथ, आशाताईंनी दादांची गीतं गायिल्याबद्दल धन्यता मानली. हृदयनाथांनी तर दादांच्या गझलांच्या ध्वनीफिती आणि कार्यक‘म केले.
    अंतरंग, येरे घना, मोगरा फुलला, ऋतु हिरवा, शब्दस्वरांच्या चांदण्यात, भावधारा, शब्द सुरांची भावयात्रा, गजल गुंजन, पुन्हा तेजाब दुःखाचे, भीमवंदना,  बुद्धवंदना ह्या दादांच्या गाजलेल्या ध्वनीफिती हृदयनाथ मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर, भीमराव पांचाळे, रंजना पेठे, रवीन्द्र साठे अशा ‘यातनाम गायकांनी ध्वनीफिती निर्मिल्या आहेत.  पुष्पाताई मेहंदळेंशी सन् 1964 मध्ये विवाह केल्यावर तब्बल तीनच वर्षांनी, दादांनी खुद्द सन् 1967 पासून जाहीर काव्य गायनाच्या कार्यक‘मांना सुरूवात केली.
    आम्हाला अजूनही आठवते आमच्या मित्रांच्या पुढाकाराने सन् 8 ऑक्टोबर 1979 मध्ये नगर वाचनालयाच्या सभागृहात बंददार रात्री आठ वाजता रंग माझा वेगळा हा न भूतो न भविष्यती असा दादांच्या जीवनाचे वैभव असलेल्या जाहीर काव्य गायनाचा कार्यक‘म भरगच्च रसिकांच्या समोर दादांनी एकट्याने कुठलीही संगीताची आणि कुणाही मनोरंजकाची साथ न घेता अखंडपणे पहाडी आवाजात  गायनाला सुरूवात केली ती तब्बल मध्यरात्रीच्या प्रहरांतरातच भैरवीने विसावली. श्रोत्यांच्या तनामनात गझल काव्यांची वैचारिक आणि सौंदर्यशील ऊर्जा निर्मिती करून दादा थांबले नाही तर काव्य लेखन आणि शिस्तबद्ध, स्वर संगीताची तीव‘कोमल जाण असलेल्या दादांनी गझलचा निनाद प्रदीर्घ काळपर्यंत निनादत ठेवला. पुढे दादांच्या रंग माझा वेगळा...मैफली अखंडपणे समाजाच्या अंधाराला दूर करीत प्रकाशाची किरणे पेरत पेरत, दीर्घकाळपर्यंत सुरूच होत्या. काव्य गायनाचे आणि काव्य सृजनाचे अखंड व‘त म्हणजे कविवर्य सुरेश भट ऊर्फ आमचे-तुमचे-सर्वांचेच दादा होय!  
    कविवर्य गझल महानायक सुरेश श्रीधर भट अमरावतीच्या मातीत 15 एप्रिल 1932 रोजी जन्मले. घरचे बर्‍यापैकी तरी फकिरासारखे भटकंती करीत जगले. घर-संसारावर तर तुळशीपत्रच ठेवले. कवितेसाठी जगले. कवितेच्या प्रतिष्ठेसाठी झीजले. नव्या पिढीच्या कवींना हक्काचे काव्यपीठ उपलब्ध करून देण्यासाठी खस्ता खाल्ल्या. मठ आणि संप्रदाय स्थापन न करताही शिष्यांनी गझल विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून दीक्षा घेतली.  खूप कष्ट सोसले. दुःख, मानापमान, अवहेलना, तुच्छता, अर्थचिंता आणि अर्थकारणात कधी अडकून पडले नाही. मिळाले तितके मित्रांसाठी-नव्या उमेदीच्या लोकांसाठी मुक्तपणे उधळले. आलेल्या पैशाची कधी गाठ बांधली नाही. दादांचे खिसे सदैव फाटकेच होते. काहीच उरत नव्हतं स्वतःसाठी आणि घरासाठी. ते स्वतः कवितेचं घरदार होते. कवितेच्या घरासाठीच आयुष्य वेचले. ससेहोलपट सहन केली. सुफी संतांसारखे जगाला प्रेमाची गितं वाटतच फिरले.
    अखेर...14 मार्च 2003 रोजी त्यांची काव्ययात्रा जीवनयात्रेसह कवितेच्या चिरंतन आणि चिरंजीव अवकाशात स्थिरावली. वयाच्या एक्काहत्तराव्या वर्षी दादा गेले. परंतु जातानाही सर्वहारांना जगा, जगवा, जगू द्या! हा संदेश देतानाच; उषःकाल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली....दादांचे हे ऊर्जास्वर मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, समाजासह जगाच्या अवकाशात संत ज्ञानोबांच्या, दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्ये पाहो । जो जे वांछील तो ते लाहो । प्राणिजात ॥  प्रमाणेच अजूनही निनादत आहेत. चिरंतन संघर्ष आणि आंदोलनाच्या परिपूर्तीची जिवंत चेतना-ऊर्जा निर्माण करीत आहेत!
    दादा, जिवंत आहेत. त्यांच्या शब्दांत. कवितेत. स्वरांत. समाजाच्या सर्व स्तरातल्या सर्वहारांसह रसिकराजांच्याही हृदयात... दादा, तुमच्या प्रतिभेच्या तिसर्‍या नेत्रातून, समाजातल्या तळागाळातल्या दुःखितांचे अश्रू पुसण्यासाठी झंझावाती एल्गारमय शब्दधनाची महायात्रा प्रारंभ केली, ती आजही सुरूच आहे, सर्वहारांच्या तनामनात. आजही काळाच्या पोकळीतून काळरात्रीच्या विनाशाला प्रतिबंध करण्यासाठी, तुम्ही आयुष्याच्या पेटवलेल्या मशाली पेटत्याच आहेत, दादाजींच्या धुनीकुंडासार‘या जनांत-मनांत. तुम्ही चेतवली आहे ती धुनी अखंड तेवत आहे. तेवत राहील. दादा, तुमच्या प्रतिभेवर शतदा प्रेम करावे, हीच आमची भावना आहे. अमरावती मित्रपरिवार तुम्हाला चिरंतन-कालातीत सलाम करीत आहे...
-डॉ. किशोर सानप
दिविशा, 249 /ए, शाहू नगर, मानेवाडा बेसा रोड,
सिद्धेश साई ओम अपार्टमेन्ट समोर, नागपूर-4434
दूरध्वनी- 9326880523

No comments: