जयदीपच्या वेगळ्या गझलेची 'दखल' : संजय शिंदे

     


 ...तर गेली अनेक दिवस तुकड्यातुकड्याने वाचत होतो तो जयदीपचा 'दखल' संग्रह काल रात्री पुन्हा एकदा सलग वाचून काढला. म्हणजे खरं तर जगून घेतला. 
        हो! कवी जसा कविता लिहिताना त्याची कविता जगत असतो तसाच वाचकही कविता वाचताना त्या कवीची कविता त्याच्यापरीने जगत असतो. अर्थात, त्यासाठी वाचकाला त्या कवितेशी तितकं एकरूप व्हावं लागतं आणि त्यासाठी कवीची कविताही तितकीच सशक्त असावी लागते. असो!
       तर सांगायचा मुद्दा हा की जयदीप जोशी या व्यक्तीला तुम्ही बहुतांशी ओळखताच. फेसबुकवरची त्यांची वॉल चाळलीत तरी या माणसाच्या एकूण जगण्याचं, उपदव्यापाचं वेड तुमच्या लक्षात येईल. हा माणूस काय करतो? यापेक्षा हा माणूस काय करत नाही हे शोधणं सोपं आहे. हा माणूस गझल लिहितो, त्यावर खूप सारी डूडल बनवतो, चित्रं काढतो, फोटो काढतो, ऑर्गन वाजवतो, गाणी म्हणतो, आवडेल तिथे भटकतो आणि...आणि असं बरंच काही! 
       एकूण या माणसाला सतत काहीतरी वेगळं करायला आवडतं. हे जे वेगळं काहीतरी हा माणूस करतो त्यातल्या अनेक गोष्टी भन्नाट व प्रयोगशील असतात. म्हणजे त्यातली प्रत्येक गोष्ट एकदम भारी वगैरे असतेच अशातला भाग नाही. पण लोकांना काय आवडेल याचा विचार करण्यापेक्षा आपल्याला काय आवडेल याचा विचार करत जयदीप त्याचे नवनवे प्रयोग करतच असतो. हीच जयदीपची खरी खासियत आहे.
       जयदीपच्या गझलबद्दल लिहिताना त्याच्या जगण्याबद्दल हे सगळं जाणून घेणं महत्वाचं वाटतं कारण त्याचं हे प्रयोगशील जगणंच त्याच्या गझलेतही पुरेपूर उतरलं आहे. रूढ चौकटीतली गझल न लिहिता जयदीपने स्वतःची अशी वेगळी गझलशैली मराठीत रूढ केली आहे असं म्हंटलं तर ते वावगं ठरणार नाही. म्हणजे जयदीपने तसा प्रामाणिक प्रयत्न केला आहे इतकं तर नक्कीच ! 
       अगदी सुरुवातीच्या काळात जेव्हा जयदीप त्याचे हे वेगळे प्रयोगशील शेर फेसबुकवर टाकायचा तेव्हा ते सगळं अनाकलनीय वाटायचं. हे काय असलं लेखन ? गझल/शेर असा असतो का ? याला गझल म्हणतात का ? अशी चर्चा गझलक्षेत्रात आजूबाजूला व अगदी माझ्याही मनात काही प्रमाणात असायची.
        कोणत्याही कलेत एखादी वेगळी शैली आणताना हे होणं अगदीच स्वाभाविक आहे. पण, रसिकांची दाद फारशी मनावर न घेता जयदीपने मोठ्या संयमाने त्याचे प्रयोग सुरूच ठेवले. आणि पाहता पाहता रसिकांना त्याचे हे प्रयोग आवडू लागले. त्यानंतर जयदीपने त्याच्या एकूण ८० गझला एकत्र करून दखल हा त्याचा पहिलावहिला गझलसंग्रह नितीन हिरवे यांच्या संवेदना प्रकाशनातर्फे प्रसिद्ध केला. 
       जयदीपच्या गझलेचं नेमकं वेगळेपण या पुस्तकातून प्रकर्षाने जाणवतं. अर्थात, प्रत्येक गझल लिहिताना त्यात काही वेगळं करायचंच असा अट्टाहास मात्र ह्या पुस्तकातल्या गझला वाचताना जाणवत नाहीत. जयदीपच्या स्वतंत्र शैलीतल्या अनेक गझला या पुस्तकात आहेतच. पण त्याहीपेक्षा वेगळ्या वाटाव्यात अशा अनेक रचनाही या संग्रहात आहेत. 
       जे जसं सुचलं तसं नैसर्गिकपणे मांडण्याचा जयदीपचा प्रामाणिकपणा या सगळ्या गझलांमधून दिसतो. म्हणूनच आशयातलं/मांडणीतलं नैसर्गिकपण जपत त्याने या गझला जशा आहेत तशा  रसिकांसमोर ठेवल्या आहेत. त्या रसिकांना किती आवडतील हे रसिक ठरवतीलच. पण, गझल लिहिताना जाणीवपूर्वक काही वेगळा विचार, मांडणी, शैली करण्याचं या गझलांमागचं श्रेय मात्र जयदीपला नक्कीच द्यावं लागेल. 
       जयदीप स्वतः एक चित्रकार आहे. त्यामुळे या पुस्तकाचं मुखपृष्ठ व मांडणी यात रसिकांच्या अपेक्षा अधिक असणं हे अगदी साहजिक आहे. या संग्रहाबाबत मुखपृष्ठ व मांडणीच्या रसिकांच्या अपेक्षा मात्र काही अंशी अपूर्ण राहिल्या आहेत. 
        जयदीपने गझलेत अजूनही मतला, मिसरा, काफिया, अलामत, रदीफ याबाबतीत अनेक नवे प्रयोग करायला हवेत. वाचकांना ते कदाचित आवडतील, कदाचित आवडणार नाहीत. पण यातूनच सध्या एका चौकटीत अडकलेल्या व तोच तोच पणा आलेल्या मराठी गझलेत काही वेगळं व आनंददायी घडेल अशी आशा वाटते.
        अशा वेगळ्या प्रयोगासाठी जयदीपला मनःपूर्वक शुभेच्छा! जयदीपच्या गझलेची वैशिष्ट्य सांगताना अजून बरेच काही लिहिता येईल. पण जयदीपचे या संग्रहातले काही उल्लेखनीय/वेगळे व आवडलेले शेर देऊन थांबणे अधिक उचित होईल.

जमिनीवरती पाय ठेवले
आकाशाला हात लागले
तुला म्हणूनच डोक्यावर घेतो मी
मनात तितकी जागा नाही आहे
सवय बदलून पाहू का
विषय काढून पाहू का

असा जाणार नाही तो
दिवस ढकलून पाहू का

विचारी वाटण्यासाठी 
कमी बोलून पाहू का
वहीचे पान फडफडले
हवेला काय आठवले
हवा डोक्यात गेली का 
कसे मग केस विस्कटले
दिवस येतील आता चांगले, विश्वास आहे
उद्या शनिवार आहे आणि मग रविवार आहे
आपली बॅटिंग आहे ना
मी घरी जाऊन येऊ का

मी तुझ्याशी बोलतो नंतर
मी जरा जेवून घेऊ का
सापाचे अजगर करता येते
छान तुला सादर करता येते
कसे दाखवू कुठे लागले ते
मन एखादा अवयव आहे का
नवे आहेत काही आपल्यामध्ये
बरे आहेत काही आपल्यामध्ये

नको लावूस तू वरची कडी आतून
खुजे आहेत काही आपल्यामध्ये
निरागस चेहरा कुठे गेला
तुझ्यामधला झरा कुठे गेला
- संजय शिंदे

                                       

No comments: