अभिषेक उदावंत : पाच गझला



१.
कोणता होता ससा माहीत नाही
हारला शर्यत कसा माहीत नाही

झोपतो निश्चिंत मी कंगाल आहे
जागतो पैसा कसा माहीत नाही

मी तसा नव्हतो कधी याच्याअगोदर
का अता झालो असा माहीत नाही

फायद्याच्या काय आहे लाल काळ्या
डागण्यावाणी मसा माहीत नाही

का पुढे तो जात नाही बायकोच्या
दाबल्या कुठल्या नसा माहीत नाही

सर्कशीला हासवावे जोकराने
मारला कोणी ठसा माहीत नाही

जोकराला त्रास होतो हासतांना
सांगतो का तो तसा माहीत नाही

बोलतांना जीभ होते फार ओली
कोरडा पडतो घसा माहीत नाही


२.
पांढरा जो भाग आहे
त्या ठिकाणी डाग आहे

वेळ जावू दे जराशी
क्षणभराचा राग आहे

खोट काढाया पुरेसा
एक छोटा डाग आहे

उलट चप्पल सरळ करणे
हा प्रथेचा भाग आहे

एक गोगल गाय शंका
चावली तर नाग आहे

आडजाताची सफाई
धूळ खातो साग आहे

का पडत नाहीत स्वप्ने
दोन डोळे आग आहे

बाभळीचा जीव घुटतो
भोवताली बाग आहे


३.
ती प्रेमाने ताट वाढते
शंका माझी दाट वाढते

जसा गुलाबी ऋतू पाहतो
थंडीची मग लाट वाढते

ज्याची पत्नी सुंदर दिसते
नव-याचा त्या थाट वाढते

मरणाची जर कळे बातमी
प्रवास अवघड वाट वाढते

जो लाडाचा मुलगा आहे
त्याचा थोडा आट वाढते

जबाबदारी संपत नाही
आयुष्याचा घाट वाढते


४.
पाण्यापाशी नुस्ती हिरवळ
सुकल्यावर मग सोसावे वळ

गोड बातमी झाली याची
उलटी झाली, थोडी मळमळ

किती चांगला माणुस मेला
ज्याच्या त्यांच्या तोंडी हळहळ

माणसामध्ये हिंमत नाही
बाई म्हणजे जगण्याचे बळ

ढवळू नकोस त्याला इतके
गढूळ होतो पाण्याचा तळ

दोन माणसे पेटुन उठले
पुढे सुरु मग झाली चळवळ

तुला जरासा सुगंध नाही
फक्त बातमी केली दरवळ


५.
बघता बघता सुंदर भिंती काळ्या झाल्या
कमी लेखण्यासाठी सुध्दा टाळ्या झाल्या

खुली मोकळी जागा  म्हणजे धोका आहे
शंका आली चिंतेभवती जाळ्या झाल्या

प्रसंग नसला तरी बायको नटते थटते
याचाच अर्थ घरात जवान साळ्या झाल्या

डिलेवरीला मणी, डोरले गहाण पडले
हौसेखातर बाळासाठी बाळ्या झाल्या

शहरामधल्या मुलींचे लग्न लवकर जुळते
वय वाढले खेड्यात मुली काळ्या झाल्या

अभिषेक उदावंत

                         

No comments: