कवीकिरण पाटील : तीन गझला



१.
ठरवले आज मी खोटे कधी वागायचे नाही‬
‪कितीही संकटे आली तरी थांबायचे नाही‬

‪सुखाची वाट चालाया जगाला सोबती घेऊ‬
‪मनाचे दुःख पण कोणा पुढे मांडायचे नाही‬

‪रिकामा पाहुनी अपुला खिसा रडतोस का वेड्या ?‬
‪सुखाचे दिवसही येतील हे विसरायचे नाही‬

‪तयारी ठेव लढण्याची, हवे ते ते मिळवण्याची‬
‪भिका-यासारखे काहीच तू मागायचे नाही‬

‪असू दे बंगला, गाडी, कुणाची लाख प्राॅपर्टी‬
‪मने श्रीमंत ना, तेथे 'किरण' तू जायचे नाही ‬

२.
‪मंदशी हासायची ती‬
‪गंधसा पेरायची ती‬

‪कैकदा भेटायची पण‬
‪फार ना बोलायची ती‬

‪ती जरी साधीच होती‬
‪अप्सरा वाटायची ती‬

‪मी नजर नजरेस देता‬
‪लाघवी लाजायची ती‬

‪बोललो नाही जरी मी‬
‪मौनही वाचायची ती‬

‪ती मला कळलीच नाही‬
‪पण मला समजायची ती‬

३.  
‪पावसाच्या सरी धुंद झेलायची‬
‪नार गुलजार ती फार वाटायची‬

‪ती अचानक मला जर कधी भेटली‬
‪नजर चोरून मग गोड लाजायची‬

‪भेटण्याचे मला ती वचन पाळण्या‬
‪वळण-वाटा किती तुडवुनी यायची‬

‪पावसाळी हवा, गंध हा गारवा‬
‪हीच आहे घडी प्रेम बहरायची ‬

‪याद येते तिची, भास होतो सतत‬
‪वेळ आलीय बघ वेड लागायची‬

‪चालणारी जरी माणसे थांबली‬
‪जिंदगी थांबते काय चालायची ?‬

‪- कवीकिरण पाटील,
निळजे (डोंबिवली)‬
 ‪8108502555

No comments: