तरल व बौद्धिक काव्यमूल्यांची कलीम खान यांची ग़ज़ल : डॉ. राम पंडित

                         


  सुरेश भटांमुळे मराठी ग़ज़ल ख-या अर्थाने रुजली. माधवराव पटवर्धनांनी तिचे बाह्यरूप व तिला अनुरूप निवडक गेय छंद मराठीत आणले होते. पण भटांनी मराठीत तरी ग्राह्य न झालेल्या या विधेला मराठमोळा चेहरा व तंत्रशुद्ध पेहराव देऊन सर्वप्रथम रुजविले. माधवरावांच्या 'गज्जलांजली'तील रचना गेय भावगीतांच्याच (प्रयोग) स्वरूपाच्या होत्या. त्यात ' तग़ज़्जू़ल ' म्हणजे ' ग़ज़लीयत 'चा अभाव प्रकर्षाने जाणवतो. भटांच्या प्रतिभेने ही कमतरता पूर्णपणे दूर केलीच, पण प्रचार - प्रसारद्वारे त्यांनी ग़ज़ल चळवळच उभी केली. याची फलश्रुती म्हणजे आज मराठीत तीनशेच्यावर कवी आपापल्या क्षमतेनुसार ग़ज़लसृजन करीत आहेत.
        भटांचे गाव अमरावती असल्याने, त्यांच्या या चळवळीचा प्रभाव व-हाडातील कवींवर सर्वप्रथम पडणे स्वाभाविक होते. अशाच कवीवर्गातले एक जेष्ठ व लक्षणीय नाव कलीम खान हे आहे.
        यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीचे कवी कलीम खान हे ग़ज़लकार, छंदज्ञात तर आहेच पण धार्मिक असूनही सांप्रदायिक एकात्मतेचे पुरस्कर्ते, देशप्रेमी, हिंदू-इस्लाम मिथकांचे जाणकार आहेत. " गझल कौमुदी " हा त्यांचा ग़ज़ल - काव्यसंग्रह म्हणूनच वाचनीय, चिंतनीय व संग्राह्य ठरतो.
        कलीम खान यांनी उर्दू शायरांच्या प्रथेप्रमाणे 'हम्द' (म्हणजे ईश्वराची प्रशंसा) व 'ना'त' (प्रेषितस्तुती)ने ग़ज़ल  संग्रहाची सुरुवात केली आहे. त्याचसोबत ते ओंकाराची देखील स्तुती करतात.
        नव पर्ण-फुले येती, कोकीळ तान घेती ;  
        ऋतुराज वसंताचा, शृंगार तुझे गाणे !

        तो नाद अनाहत जो, चैतन्याचे कारण ;
        सृष्टीच्या प्राणांचा, हुंकार तुझे गाणे !

        प्रेषित मुहम्मदाच्या स्तुतीत सश्रद्धपणे कलीम खान नोंदवितात-

        धर्मविक्रीची दुकाने, बंद ज्यांची जाहलेली ;
        त्या पुरातन शोषकांना, झोंबला माझा मुहम्मद !

        जेथली सृष्टी पराभुत, हारलेले अंतरात्मे  ;
        त्या मरुक्षेत्रात सुद्धा, जिंकला माझा मुहम्मद !

        कृष्णत्व मज देऊ नको ;
        पण अर्जुनाचे कान दे!
अशी विनंती करणारा हा कवी सश्रद्धपणे कधी प्रार्थना करीत ईश्वराकडे पसायदानाप्रमाणे आपले मागणे नोंदवितो किंवा आपली इच्छा वाचकांसमोर व्यक्त करतो -

        अभिमान जिंकण्याचा,मजला कधी न होओ !
        अन् हारलो तरीही, त्रागा कधी न होओ !

        ही जिंदगी असावी, राधेसमान सखये ;
        वनवास भोगणारी, सीता कधी न होओ !
        कवीची  सकृतदर्शनी ही व्यक्तिगत इच्छा आहे. खरं तर ती व्यापक प्रतिनिधीत्व करते एका सकारात्मक निस्पृह विचारधारेचे. कलीम खान यांच्या ग़ज़ला मुरद्दफ व गैरमुरद्दफ दोन्ही स्वरूपात साकारतात. त्या विषयवैविध्य लेवून येतात तर कधी क्रमबद्ध स्वरूपातही अवतरतात . त्यांच्या लक्षणीय अशा मोजक्या शेरांचे स्वरूप पाहा —
        अल्पसे हे दुःख याचा, फार बोभाटा नको ;
        किन्तु भय वाटेल इतका, दीर्घ सन्नाटा नको!
        ग़ज़लेत व्यक्तिगत दुःखांना 'मोअर दॅन कॅनव्हास' पेश करण्याची प्रदीर्घ परंपरा आहे. त्यावर हा शेर चपखल तर बसेलच पण दुसर्‍या ओळीने त्यातील आशय कॅलिडोस्कोपिक होतो.
        मार-मारुनी चोची, घाव हे दिले ज्यांनी ;
        स्पर्शती न पिंडाला, तेच कावळे आता!
        हा शेर 'सहले मुम्तना'चा अर्थात सकृतदर्शनी फारच सरळ पण आशयघन म्हणता येईल असा आहे . अर्थ सहज कळतो. स्वकियांच्या वर्तनावर हा टिप्पणी करतो. ग़ज़लेतील प्रत्येक शेरात एक परिपूर्ण कविता अपेक्षित असते पण ती अमूर्त असता कामा नये. प्रतीकं, उपमा इत्यादीद्वारेही ती आकलन कक्षेत यायला हवी.
        पाहू नकोस मागे, गेलीत खूप वळणे ;
        मार्गस्थ पावलांतुन, आवाज एक आला!
        विगत काळाचा मागोवा घेत त्यातच रमणे किंवा अकारण व्यथित होत राहणे व्यर्थ आहे. पुढे जाणारा काळ हेच बजावतो. नाॅस्टेलजियात जगण्याचा इथे निषेध सौम्य भाषेत आहे.
        तू चालायाचे म्हटले, मी चालत आहे केवळ ;
        हे कधीच नाही कळले, तू मजला कोठे नेशी!
अंधानुकरण वा अनुसरण येथे अधोरेखित करण्यात आले आहे. 
संस्कृती हडप्पा माझी, आहे रक्तात अजूनी ;
शरीरात प्रगत काळाच्या,आहेत पुरातन पेशी!
कलीम खान आपली ओळख या शेराद्वारे करून देतात. एका वैदिक उक्तीचे कवीने आपल्या शेरात किती सहजपणे अंतरंग नव्याने उलगडले पहा —
        रहा चालत, रहा चालत, स्वतः लक्ष्ये पदी येती;
        म्हणोनी वेदही म्हणती, 'चरैवेती,चरैवेती'!
        विजांकित अंबरी जर ते, सुरक्षित गर्भ मेघांचे ;
        कशा मग वाळवंटाच्या, सजल हाका मला येती!.
        आपण आहोत त्याहून आपली वेगळी प्रतिमा स्थापित करणारे व्यक्तिमत्वावर एक वेगळा मुखवटा धारण करतात. मग आचरणातही त्यांना नाटकं करावी लागतात —
        चढवले रंग चेह-यावर कितीदा मी ;
        पुरे नाटक, पुन्हा नटणे नको आता!
        जसे आहे, तसे असणार, हे कळले ;
        कुणावरही उगा रुसणे नको आता!
        पुढे या खोट्या अभिमानाचाही वीट येतो. कारण वास्तव केव्हातरी पुढे ठाकतंच. कवीला हे ज्ञात होताच तो प्रांजळपणे कोणावर अकारण नाराज होणे व्यर्थ आहे हे कबूलही करतो.
        कलीम खान यांच्या शेरांतून त्यांचं व्यक्तिमत्व, वैचारिक जडणघडण यथार्थ पणे जाणता येते. कारण या रचना जीवनानुभवातून साकारल्या आहेत.
        माणसात काकवृत्ती असणे ही गोष्ट खरी पण कवीने माणसाच्या संसर्गाने कावळ्याची वृत्ती कशी झाली ते या शेरात व्यक्त केले आहे —
        स्पर्श होता माणसाचा, कैकदा मी पाहिले ;
        जातभाईलाच अपुल्या, टोचणारे कावळे!
        शब्दांच्या शैलीदार मांडणीने हा शेर एका वेगळ्याच वाचनीय पातळीवर जातो. या संग्रहातील ग़ज़लांत असे बरेच शेर वाचकाला सुखद धक्का देणारे आहेत. काही अशाच लक्षणीय शेरांचा भाष्याविना आस्वाद घेऊ या. यातील अर्थघनता सहज जाणवेल.
        ग़ज़लेत अलंकारांचा भरणा झाल्यास तिला 'मुरस्सा' म्हणतात. ते अलंकार वाचकांना /श्रोत्यांना संप्रेषित होणे मात्र अत्यावश्यक मानले जाते. कवीचे शेर पहा —
        देही वसंत माझ्या, आला कशास वेड्या ;
        शृंगार शाप आहे, माझ्या तृणा-तृणाला
        मी पेटलेच नाही, वणव्यातही सख्या रे ;
        देहा शिवाय काही, नाहीच सर्पणाला!
        अंधार जीव जाळी, माझी अशी दिवाळी ;
        घेऊन दीप हाती, येशील का सणाला ?
        येथे अर्थ ध्वनित केला आहे. आशय बहुसंदर्भीय आहे. जीवनाच्या विविध अंगांचे एकाच शेरात आकलन व्हावे हेच शेराचे वैशिष्ट्य असते.
        अशाच आशयाचे हे दोन शेर मुलाहिजा हो —
        भंगले देऊळ त्यांचे, अन् मशिदी खंगलेल्या ;
        गंजले ऐसे खिळे की, धैर्य ख्रिस्ताचे गळाले!
        कोठवर सत्तांधतेचा, कौरवांना दोष द्यावा ;
        हाय, सत्तेचीच वस्त्रे, भीष्म, द्रोणाचार्य ल्याले!
        विद्यमान राजकारणावर हा शेर किती समर्पक ठरतो ? कौरव कोण ? भीष्म, द्रोणाचार्य कोण ? हे जो तो आपापल्या निकषानुसार ठरवेल.जगात शाश्वत असे काही नाही. नश्वरता हीच शाश्वत आहे याचे भान कवीला आहे, म्हणून तो सौंदर्याच्या अनुषंगाने बजावतो —
        सौंदर्य हे तनांचे, वाटे जया चिरंतन ;
        त्यांनी उजाड पडक्या, वाड्याकडे बघावे!
        ग़ज़लेत आता विषय वा शैलीचे बंधन राहिले नाही. समग्र विषयांत ती अभिव्यक्त होते. तिच्यात निसर्गचित्रणही होत आहे ते असे —
        बेधुंद बरसतो श्रावण, नखशिखांत भिजली झाडे ;
        अंधार लपेटुन घेता, सवतीवत वीज कडाडे!
        आकाश ढगांनी गिळले, सूर्याचा पत्ता नाही ;
        पण लाजत-लाजत आता, उघडी होतील कवाडे!
        नुसतं निसर्ग वर्णन असतं तर ते ग़ज़ल फाॅर्ममधील गीत गणलं गेलं असतं. पण इथेही कवीने शेरात गीतात्मक कविता ओवली आहे व त्याने काव्यसौंदर्य प्रत्ययास येतंय.कलीम खान यांची ग़ज़ल सुरेश भट परंपरेतील आहे. परंतु भटांचा प्रभाव अन्य समकालीनांप्रमाणे मात्र अंधानुकरण भासत नाही. प्रेरणा व अनुकरण यांत उधारी आणि चोरीसारखा फरक असतो. त्यामुळे भटांच्या पश्चात अनेक ग़ज़लकार सृजनशील राहिले नाहीत.
        माझा मुहम्मद वेगळा ;
        त्याची फकीरी शान दे!
        किंवा
        कैकदा माझ्या मनाला वाटते ;
        जाणत्यांसाठी लिहावे वेगळे!
खरेतर कलीम खान यांनी वेगळे आणि आगळे दोन्ही त-हेने सृजन केले आहे. दोन शेर पहा—
        दूर-दूर त्या रानामध्ये, सूर्य झोपला सरणावरती ;
        हळुच थांबली संध्या तेथे, जाता-जाता वळणावरती!
        दिवसाचे अवसान जाहले, सती पश्चिमा मळवट ल्याली ;
        एक रक्तिमा पसरत आली, बद्ध नदीच्या धरणावरती!
        हे लॅण्डस्केप अलवींच्या शेरांशी नातं सांगतं. 'गोटीबंद', 'खणखणणे' इथे नाही पण शेर भिडतात, हाॅन्ट करतात व नवीनतेची चाहूल देतात. प्रगल्भ झाल्यावर परंपरेचं बोट सोडून असं स्वयंपूर्णही व्हावं लागतं कवीने. कलीम खान यांचा हिंदू मायथाॅलाॅजीचा सखोल अभ्यास आहे. विशेषतः रामायण, महाभारतातील राम, सीता, बिभीषण, कैकयी, लक्ष्मण, कृष्ण, अर्जुन, कौरव, शकुनी, अहल्या, यज्ञ,  वेदी इत्यादींचा वृत्ती-प्रवृत्ती निर्देशासाठी प्रतिकात्मक विनियोग ते अत्यंत समर्पकपणे करतात. खेदाची गोष्ट म्हणजे त्यामानाने आपण इस्लाम धर्मातील मिथकांचा काहीच अभ्यास केलेला नाही.
        जरी खाणा-खुणा इथल्या, कधी पुसणारही नाही ;
        मनाची ती जुनी वस्ती, पुन्हा वसणारही नाही!

        अभंगाचेच डोहाळे, तुला इंद्रायणी कां गे ;
        अता दिंडीत ह्या खोट्या, तुका असणारही नाही!

        नव्या रामायणामध्ये, असेलच मंथराही पण ;
        शहाणी कैकयी झाली, सहज रुसणारही नाही!
        'कससुल अंबिया' या ग्रंथात प्रेषित मुहम्मद व अन्य नबींच्या जीवनकार्याचा परिचय मिळतो. यावरूनही अनेक सृजनक्षम प्रतीकं कवींना उपलब्ध झाली आहेत. आपण मात्र 'लैला-मजनू', 'शिरी-फरहाद', 'येशू-वधस्तंभ' इ.उपमा,प्रतिकांच्या पुढे जातच नाही. कारण कलीमखानप्रमाणे आपली अन्यधर्मीय वाचन प्रवृत्ती नाही.
        या संग्रहातील आणखी काही मिथकीय शेर पाहा —
        जर तू उमा, शिव मी सखे ;
        तुझिया सवे असतोच मी!
       
        मीरा मनातली अन्, राधा तुझ्या तनाची ;
        माझ्यात विर्घळावी, कंठास प्राण येता!
     
        काब्यात एकवटल्या, जमजममध्ये हजारो ;
        काशीत अन् विखुरल्या, गंगाजळात जखमा!
       
        विस्मृतिची एक अहल्या, पडलेली धुळीत होती ;
        कोणाच्या पायरवाने, ती आज अशी उद्धरली!
       
        द्रोण या युगातही, मागणार अंगठा ;
        एकलव्य आजचा, पण अता फसेल का ?
        ग़ज़लेत विविध विषयांचे शेर असल्याने वाचक/श्रोत्यांना मार्गांतरणाने काव्य आस्वाद घेताना रसभंग होतो असे काव्यज्ञांचे मत आहे. माझ्या मते चांगल्या ग़ज़लेला एक अदृश्य आंतरिक सूत्र त्या विविधतेत अद्वैत साधते. उदाहरणार्थ हे काही शेर पाहा —
        माणसे पाहिजे, मान हलवावया ;
        होयबांचे इथे, कारखाने सुरू!

        ओढण्याची मुजोरी जगन्नाथ रथ ;
        आज केली तिथे, एकट्याने सुरू !

        खायचे कायदे, प्यायचे कायदे ;
        हाय, अपराधही, कायद्याने सुरू !

        मेंढरांना सुरक्षा मिळावी म्हणुन  ;
        हाय, केला लढा, लांडग्याने सुरू !

        आता कवीच्या एका ग़ज़लचे काही शेर पाहा  —
        आकाशवेणा वादळी, जेंव्हा कधी ते सोसती ;
        माझे सराइत शब्दही, कित्येकदा घायाळती !

        जिंकूनिया समरांगणी, येतात जेंव्हा वेदना ;
        मज प्रश्न पडतो कैकदा, कैसी करावी आरती !

        मम अस्मितेचे शेवटी, नव-सरण जेंव्हा पेटले ;
        तेंव्हा चितेवर आतली, संवेदना गेली सती !
        इथे शेर वेगवेगळे विषय घेऊन आलेत पण त्यांतील उत्तम कवितेमुळे, विषयाचे मार्गांतरण तितकसं खटकत नाही. अशा ग़ज़लचा आस्वाद घेण्याची सवय आता हळूहळू मराठी काव्यरसिकांना होऊ लागली आहे. वेळ लागेल पण उर्दू ग़ज़लरसिकांप्रमाणे मराठी काव्यरसिक ग़ज़ल विधेला कवितेच्या समकक्ष मानतील व काव्यसमीक्षक (थोडी मेहनत घेऊन ग़ज़लतंत्र-मंत्र जाणून घेतील तर) ग़ज़ल-काव्याची समीक्षा देखील करतील.
        खालील क्रमबद्ध (मुसलसल) ग़ज़ल पहा. शेरात विलगतेतही एकाच मूडची सुसंबद्धता आढळते.
        आतल्या आत मी, ताठ होतो जरी ;
        मोडता-मोडता वाकलो कैकदा!

        अंतरे राखुनी, राहिलो पण तरी ;
        स्पर्शता मी मला, बाटलो कैकदा!

        विस्तवाला सहज, पचवुनी शेवटी ;
        गार पाण्यामुळे, भाजलो कैकदा !

        माझिया अंंतरी, लपुन जो बैसला ;
        त्या ययातीमुळे, लाजलो कैकदा !
        ग़ज़लचे छंद तुलनात्मक विचार करता आपल्या बहुतांश छंदाहून सृजन-सुलभ व सरस गेयता बाळगून आहेत. 'शार्दुलविक्रिडीत' हा वार्णिक छंद गेय असून सृजन-सुलभ नाही. पण व्योमगंगा, वियदगंगा, देवप्रिया, मेनका हे छंद कवीला रचनासुलभ वाटतात.
        कृष्णाच्या तत्त्वांचे ओझे, झालेच कधी अवजड, बोजड ;
        मीरेच्या भजनी तालावर, राधारुन अविरत नाचावे !
        जातीय तणावाच्या वेळी, बस एक उपाय मला सुचतो ;
        अकबरने गीता उघडावी, कुरआन हरीने वाचावे !
*
        झोपली सारी घरे, पेंगले प्रासादही ;
        जागते अजुनी तरी, एक पागल पायरी !
        बंधने, संकेतही, तोडुनी मी कैकदा ;
        भैरवी नंतर पुन्हा, छेडतो आसावरी !
*
        तू प्रकाशावे म्हणोनी, मी स्वतःला जाळतो ;
        अन् तुझ्या गर्भातली मग, वादळे धुंडाळतो!

        पाहतो बाहेर जेंव्हा, मी मला लाटांवरी ;
        एक दर्या वेदनेचा, आतही फेसाळतो!

        घेउनी आदर्श थोडे, तत्व अन् थोडा अहं ;
        रोज सारवतो मला मी, पण तरी भेगाळतो !

        भाकरीचा गर्भ माझ्या, वाढतो पोटामध्ये ;
        अन् भिकारी पाहिला की, मी पुन्हा डोहाळतो!
*

        येऊन ज्या ठिकाणी, थकलेत बैल माझे ;
        तेथून हाय, आता, नुसता चढाव आहे !

        सर्वांग साखरेचे, घेऊन चाललो अन् ;
        वस्तीत वारुळांच्या, पुढचा पडाव आहे !

        दोन्ही कडून लढतो, मी एकटा मुरारी ;
        माझेच शस्त्र आणिक, मजलाच घाव आहे !

        ही चौकशी न करता, 'हा देव कोणता रे?'
        पूजेत तेवण्याचा, माझा स्वभाव आहे !
        उर्दू ग़ज़लच्या दोन परंपरा मानल्या जातात. एक 'दाखिली ग़ज़ल' व दुसरी 'ख़ारिजी ग़ज़ल'. 'दाखिली ग़ज़ल ' दिल्ली स्कूलचे प्रतिनिधित्व करते व 'ख़ारिजी ग़ज़ल'  लखनऊ स्कूलचे प्रतिनिधित्व करते. पहिल्या परंपरेत भावाभिव्यक्तीला महत्त्व आहे तर दुस-या परंपरेत बाह्यरूपाचे देहवर्णन प्रामुख्याने आढळते. सुरेश भटांनी या दोन्ही परंपरेचा समतोल आपल्या ग़ज़लमध्ये साधला आहे.
        कलीम खान यांनी देखील दोन्ही परंपरा सांभाळल्या.
        हा तुझा गोजिरा, कामदेवापरी ;
        रुद्र माझ्यातला, जागवी चेहरा !
        पण त्यांच्या ग़ज़लेत भटांप्रमाणे शृंगार निर्भीडपणे व्यक्त होत नाही. वरील शेराप्रमाणे संयमित स्वरुपात येतो. काही पौराणिक स्वरूपाचे शेर ऐका —
        मी पणाला लाविली, अस्मितेची द्रौपदी ;
        अन् शकूनीने पुन्हा, तेच फासे फेकले !

ये रे भगिरथा, ये अता, पापे पिळायाला हवी ;
        गंगेस या दुःखातुनी, मुक्ती मिळायाला हवी !

        अभिशप्त सूर्य जळतो, प्राशून सागराला ;
        धरणी म्हणे, 'अगस्ती नाही अजून गेले'!

        साशंक पार्वतीचा, आदीम प्रश्न आहे ;
        शिव शोधतो कुणाला, घेऊन चंद्र भाळी ?

        वस्तू न असे स्त्री जगती आज नृपाळा ;
        शकुनीसह द्यूतात पुन्हा डाव कशाला ?

अन्य धर्माचं मिथक प्रतीक रुपात वापरताना कवीला निदान आज तरी अत्यंत सतर्क राहिले पाहिजे. कारण कोणाची अस्मिता केव्हा कधी दुखावली जाईल याचा नेम नाही. परंतु उपरोक्त शेरांतील मिथकांचा वापर दादलेवा आहे.
        काव्य नेहमीच समकालीन प्रवृत्ती, वातावरण, विविध परिवर्तनांवर सांकेतिक भाष्य करीत असते.
        देशातील विद्यमान सामाजिक जीवनाची कल्पना खालील शेरांवरून करता येईल —
        जांभूळ, साग, चंदन, कापून टाकलेले ;
        निवडुंग राज्य करती, इथल्या वनात आता !

        निर्वासितांप्रमाणे, आलेत नाग येथे ;
        त्यांचीच मुख्य वस्ती, अयत्या बिळात आता !

        व्यापून टाकलेले, आकाश वामनांनी ;
        नर्तन नव्या बळींचे, कुठल्या नभात आता !
        परिस्थितीचे विदारक चित्रण 'निवडुंग', 'नाग ',' बळी-वामन ' या मिथक प्रतीकांवरून कळून येते. अनेक शब्द व्यापणारी बाब अशा प्रतीकांचा वापर करून एका शब्दात किती समर्थपणे सांगता येते ते असे.
        परप्रांतीयांनी महाराष्ट्राकडेच धाव घेतली आहे. जणू सारा देशच इथे गर्दी करून आहे अशी स्थिती आहे. याने महानगरीयच नव्हे तर संपूर्ण राज्याचा समतोल बाधित होतोय —
        आकाश वाघुळांनी, व्यापून टाकलेले ;
        पक्षी दिगंतराला, कोठून जाय आता !

        या रे, कुणीही या रे, वस्ती इथे करा रे ;
        हिंदोस्थान झाला, उघडी सराय आता !

        हे येवढे खरे की, मथुरेतलेच बोके ;
        गोकूळच्या दुधाची, खाणार साय आता !
        वरील शेरांतून कवीने राज्यच नव्हे तर राष्ट्राच्याही संदर्भातील परिस्थिती मांडली आहे.
        प्रांतीय, भाषिक, सामाजिक व सांस्कृतिक एकात्मतेचा संदेश कलीमखानच्या ग़ज़लेचा गाभाच आहे. या संदर्भातील त्यांचे शेर पहा —
        मीच दिल्ली, मीच केरळ, मीच हिंदुस्थान आहे !
        मरणही माझे भुईला, कुंकवाचे दान आहे !

        अस्मिता माझी नसांतुन, थिरकते आहे तरीही ;
        पैंजणांतिल घुंघरांना, उंब-याचे भान आहे !

        बाबरी मस्जिद असो वा, जन्मभू पुरुषोत्तमाची ;
        माझिया साठी अयोध्या, आदराचे स्थान आहे !
        दुसर्‍या धर्माबद्दल, त्यातील आराध्यांबद्दल आदरभाव या संग्रहात पदोपदी जाणवतो. बाबरीच्या संदर्भात कटुतेची भावना न ठेवता त्या तेथील भूमीला आदर देणे ही सामान्य गोष्ट नाही. हा शेर सुसंस्कृत अंतःकरणातून उमटू शकतो. मात्र प्रश्न पडतो की कां अन्य मराठी ग़ज़लकारांच्या ग़ज़लेत या घटनेबाबत निषेधाचा शेर आला नाही.
        ग़ज़ल, गीत, कविता हे पद्याचेच प्रकार आहेत. त्यामुळे त्यांचे स्तरीय मूल्यांकन काव्य-निकषांवरच व्हावयास हवे. बाह्यांगाच्या पृथकतेवरून त्यांना एकमेकांपासून विलग समजणे अनुचित म्हणावे लागेल. ग़ज़लचा शेर सूत्रकाव्याप्रमाणे असून कविता ही आकरग्रंथ वा भाष्यग्रंथाप्रमाणे आहे. कवितेचा कॅनव्हास केव्हाही विस्तृतच असणार यात काही शंका नाही. पण सूत्रबद्ध-छंदोबद्ध रचनेची सखोलता अंतःकरणाचा ठाव घेण्याची क्षमता बाळगून असते. ग़ज़ल ही गीत व कवितेचा सुवर्णमध्य आहे. अर्थात तिथे रचनाकारास अभिव्यक्तीसाठी शब्दांबाबत (छंद निर्वाहासाठी) तडजोड करावी लागते व त्यामुळे कृत्रिमता दाखल होणे सहज शक्य आहे, हे ग़ज़लकारांनी मान्यच केले पाहिजे. पण हे छंदोबद्ध काव्य वा गीतातही घडू शकते
एखाद्या लक्षणीय कवितेचा आवाका एका चांगल्या शेरात 'गागरमें सागर' या न्यायाने सामावू शकतो. कलीम खान यांचे अनेक शेर कधी कविता तर कधी गीतांचे चरण भासतात. ग़ज़ल या दोन्ही अंगाने साकारत असते. उर्दूत फ़ैज़, जाफ़री, इफ़्तेख़ार आरिफ़ यांची ग़ज़ल कवितेजवळ जाते तर निगार सहबाई, इब्ने इंशा यांच्या अनेक ग़ज़ल गीतांचा रंग लेवून येतात.
        ग़ज़लचे एखाद दोन शेरच 'आमद' चे म्हणजे उत्स्फूर्त असतात. ज्यात वृत्त आपोआप येतं. रदीफ, काफिये सहजपणे साकारतात. मात्र बहुधा उरलेले शेर 'आबुर्द' म्हणजे जोडकाम असतात. काही सन्माननीय अपवाद असू शकतात. म्हणूनच गालिबला देखील 'कुछ और चाहिए वुस्अत मेरे बयाॅंके लिए' म्हणजे मला अभिव्यक्तीसाठी विस्तृत अन्य माध्यम हवं असं म्हणावसं वाटलं.
        प्रासादिकता, विरोधाभास, छंद, रदीफ, काफिया यांच्यामुळे ग़ज़लचं सौंदर्य अबाधित आहे हे मान्यच करायला हवं. म्हणूनच एवढी वर्षे टीका होऊनही फारसी, उर्दू, हिंदी, गुजरातीत ग़ज़ल लिहिली जात आहे. मराठी ग़ज़लकारांत बरेचजण विरोधाभास हाच ग़ज़लचा मूळ गुण मानतात. गायक मानत असतील तर ते ठीक आहे कारण कॅची शेरावरच त्यांच्या गायनाची गुजराण होत असते. पण असे शेर मुशाय-याचे असतात. साहित्यिक स्तरात त्यांची सहसा गणना होत नाही. काफियेबाबत मराठीसारखे सोवळेपण उर्दूत पूर्वीपासूनच नाही. गणाच्या वजनात अलामत सांभाळून स्वरसाम्य असलेला शब्द म्हणजे काफिया होय. तो यमक /अनुप्रास देखील असतो.
        कलीमखानच्या ग़ज़लांचे अनेक रदीफ वेधक आहेत. त्यांच्या काही रचनांत ग़ज़लेत प्रकर्षाने आढळणारा विरोधाभासही दिसतो. पण त्याचं या संग्रहात प्राबल्य आहे असं नाही.
        नवी पिढी आपल्या युगाची भाषा व शैली घेऊन तर आलीच आहे पण त्यासोबत त्यांचे विषय पूर्वसूरींपेक्षा वेगळे आहेत. शिवाय जेष्ठांचे इथे अनुसरण नाही की प्रभाव नाही. किंचित खटकणारी गोष्ट म्हणजे ही मंडळी ग़ज़लच्या चुस्तपणाकडे थोडं कमी लक्ष देते. सहा-सात शेरांपेक्षा जास्त शेर ग़ज़लेला ढगळ बनविते असे ग़ज़लतज्ज्ञांचे मत आहे. कारण अशा वेळी बरेचदा ग़ज़लकार काफियाच्या अंगाने ग़ज़ल रचित जातो असं जाणवतं. आजही कार्यशालेय निर्मित ग़ज़लकार काफियाच्या अंगानेच ग़ज़ला पाहताहेत. ग़ज़ल सुचत नसेल तर गीत लिहावं, कविता लिहावी किंवा एकटा दुकटा शेर लिहून मोकळं व्हावं. कृतक ग़ज़लसृजन ग़ज़लविधेला बदनाम करतं.
        अशात कलीमखानसारखे जेष्ठ ग़ज़लकार तंत्रशुद्ध, आशयघन, तरल, सर्वांगीण ग़ज़ल रचताहेत व तिच्यात नव्याजुन्याचा सुरेल व सुरेख समन्वय आहे ही बाब मराठी ग़ज़लच्या उज्ज्वल भवितव्याची साक्ष देते असेच म्हणावे लागेल.
        कलीम खान यांनी या पुस्तकात दोन परिशिष्टे जोडलेली आहेत–१) गझलेचे वृत्तशास्त्र आणि २) रुबाई.
        ग़ज़ल व रुबाईचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तर त्यांचा उपयोग होईलच पण नवोदित ग़ज़लकार, रुबाईकारांना सुद्धा तांत्रिक बाबतीत ती मार्गदर्शक ठरावी अशी आहेत.


- डॉ. राम पंडित 
Ph. D. ( उर्दू , हिंदी) 
                                     

No comments: